आमचा अभ्यास अधिवेशनात दाखवून देवू
धनंजय मुंडे
मुंबई : मुख्यमंत्र्यांना विरोधकांचा अभ्यास कमी वाटत असेल तर तो आम्ही अधिवेशनामध्ये दाखवून देवू असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना दिला आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले होते. त्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. साडेतीन वर्ष अभ्यास करूनही मंत्रालयात जाळ्या लावण्याची वेळ आलेले देवेंद्र फडणवीस सरकार केव्हाच नापास झाले आहे अशी टिकाही धनंजय मुंडे यांनी केली.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप सरकारचा मराठीबद्दलचा बेगडी चेहरा समोर आला असल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मराठी भाषा दिन उद्या आहे आणि आज सरकारने राज्यपालांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद न करून स्वतःचा खरा चेहरा समोर आणला आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीत तर अनुवाद होतच नव्हता, त्यापेक्षा ही भयंकर बाब म्हणजे या भाषणाचा अनुवाद गुजरातीत होत होता.असे हे फसवे सरकार असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.
राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून देवेंद्र फडणवीस सरकारने मराठी भाषेचा अवमान केला आहे. मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. त्यानंतर विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देवून सरकारचा धिक्कार केला अशीही माहिती मुंडे यांनी दिली.