अनाथ बालकांना मिळणार विभागातच प्रमाणपत्र
महिला व बालविकास विभागाचे सहाय्यक आयुक्तांना देणारअधिकार
मंत्री, महिला व बालविकास
मुंबई : राज्यातील अनाथ बालकांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्या विभागातील महिला व बालविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडून देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
मंत्री महिला व बालविकास यांच्या विधान भवनातील दालनात अनाथ बालकांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, अनाथ बालकांना त्यांच्या संस्थेतील कालावधी संपल्यानंतर त्यांना सर्वसाधारणपणे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अनाथ मुलांची जात नक्की माहीत नसल्याने, त्यांना कोणत्या एका विशिष्ट प्रवर्गात समाविष्ट करता येत नसल्याने त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलतीपासून वंचित रहावे लागत होते ही बाब गांभीर्याने घेवून भावी आयुष्यात अडचणी निर्माण होऊ नये यासाठी अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री मुंडे म्हणाल्या की, १८ ते २१ वयोगटातील अनाथ बालकांना स्थैर्य देण्यास वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी संबंधित विभागाला प्रस्ताव पाठविण्यात येणार असून त्यांना अनुरक्षण गृहात राहण्यासाठीही प्रयत्न करण्यात येईल. शिक्षणात शिष्यवृत्ती देण्यासाठी शिक्षण विभागास महिला व बालविकास विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच अनाथ बालकांना आधारकार्ड लवकरात लवकर मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अनाथ मुलींशी लग्न करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
अनाथ बालकांना त्यांच्या संस्थेतील कालावधी संपल्यानंतर त्यांना संस्थेच्या बाहेर जावे लागते परंतु त्यांना राहण्यासाठी कसलाही आधार नसतो यासाठी त्यांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्य देण्यासाठी सकारात्मक विचार करणार, या व्यतिरिक्त अनाथांच्या विविध समस्या इतर विभागाशी संबंधित असल्याने त्या समस्यांसाठी महिला व बालविकास विभागाकडून प्रस्ताव तयार करुन त्यांना पाठविण्यात येणार आहे.
१५ वर्षापुढील सर्व अनाथ बालकांना कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण सक्तीचे करण्यात येणार असल्याचे सांगून अनाथ बालकांना त्यांच्या आवडीचे आणि त्यांच्यात असलेल्या कौशल्यानुसार विविध कोर्सेसचे प्रशिक्षण त्यांना देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यामुळे अनाथ बालके भावी आयुष्यात स्वत:च्या पायावर उभी राहू शकतील असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.