नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश करणार की राज्यसभेवर वर्णी ?
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याने पुन्हा त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाची चर्चा सुरू झाली आहे. काल रात्री उशीरा भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यात बैठक झाली. हि बैठक सकारात्मक झाल्याचे समजते. बैठक संपल्यानंतर नारायण राणे यांच्या चेहऱ्यावरील ‘हास्य’ सर्व काही सांगत होते.
भाजपच्या मुख्यमंत्र्यांची परिषद दिल्लीत असल्याकारणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौ-यावर होते. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि नारायण राणे यांच्यात बैठक पार पडली. नारायण राणे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी केली तर राणे यांना राज्यसभेवर पाठवायचे याबाबत या बैठकीत चर्चा झाली. २३मार्च रोजी एकूण राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. शिवसेना , काॅग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एका जागेवर आपला उमेदवार निवडून आणू शकतात तर संख्याबळानुसार भाजपच्या कोट्यातून तीन जणांची वर्णी लागू शकते. मंत्रिमंडळ समावेशावरून राणे यांनी भाजपला अनेक वेळा इशारा दिला होता.तर नारायण राणेंचा लवकरच मंत्रिमंडळात समावेश करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले होते.