धनंजय मुंडे यांच्याबाजुने सर्व सदस्य एकवटले
कोणतीही शहानिशा न करता वृत्त प्रसिध्द करणाऱ्या माध्यमांवरही कारवाई करा…सदस्यांची मागणी..
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आणि विधीमंडळावर झालेल्या दलालीच्या आरोपावरुन विधीमंडळातील सदस्य धनंजय मुंडे यांच्याबाजुने एकवटल्याचे चित्र सभागृहामध्ये आज पाहायला मिळाले. सर्वच सदस्यांनी शहानिशा न करता वृत्त प्रसिध्द करणाऱ्या आणि सदस्यांवर आरोप करणाऱ्या वाहिनीवर कारवाईची मागणी लावून धरली.
सभागृहामध्ये, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार शरद रणपिसे
शिवसेनेचे आमदार अनिल परब, आमदार निलम गोऱ्हे, शिक्षकभारतीचे आमदार कपिल पाटील, आ.जोगेंद्र कवाडे, सौ. विद्या चव्हाण,आमदार अमरसिंह पंडित या सदस्यांनी विधीमंडळावर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपावर आपले विचार मांडताना आपली नाराजी व्यक्त केली. शिवाय वृत्तवाहिनीने केलेल्या बदनामीबाबतही तीव्र संताप व्यक्त केला.
पहिल्यांदा विधानपरिषदेमध्ये सत्ताधारी सदस्यांनी विरोधी पक्षनेत्यावर झालेल्या आरोपावर भाष्य केले. विशेष म्हणजे प्रत्येक सदस्याने विधीमंडळावर करण्यात आलेल्या आरोपावर गंभीरतेने चर्चा केली आणि विधीमंडळाच्या विश्वासार्हतेबाबत निर्माण करण्यात आलेल्या प्रश्नचिन्हावर आक्षेप घेतला.