शिवस्मारकाचे काम पावसाळ्यापूर्वीच सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शिवस्मारकाचे काम पावसाळ्यापूर्वीच सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्यासंदर्भातील लेटर ऑफ एक्सेप्टन्स आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारकाचे काम करण्यासाठी नेमलेल्या एल अँड टी कंपनीला देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जागतिक किर्तीचे स्मारक लवकरात लवकर व्हावे. यासाठी कंपनीने काम पावसाळ्यापूर्वीच सुरू करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी एल अँड टी कंपनीचे संचालक एम. व्ही. सतीश व सुशांत शहादेव यांच्याकडे हे पत्र सुपूर्द केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे,  मुख्य सचिव सुमित मलिक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते. यावेळी स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण आशिषकुमार सिंह यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गेल्या १५ वर्षापासून छत्रपती शिवाजी स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. हे सरकार आल्यानंतर आमदार विनायकराव मेटे यांना स्मारक समितीचे अध्यक्ष करून कामाला गती दिली. राज्य शासनाने अतिशय जलदगतीने काम करत या स्मारकासाठी लागणारे सर्व परवाने आणले आणि आज एल अँड टी या कंपनीला काम सुरू करण्यासंदर्भातील पत्र देण्यात आले. जागतिक किर्तीचे हे स्मारक होणार असून एल अँड टी कंपनीला या कामामुळे वेगळी उंची प्राप्त होणार आहे. कंपनीने पावसाळ्यापूर्वीच स्मारकाचे काम सुरू करावे. तसेच अतिशय वेगाने संपूर्ण स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. कमी कालावधीत जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे वैशिष्ट्यपूर्ण कामही कंपनीला करण्यास मिळाले आहे. स्मारकाचे काम सुरू करण्यासाठी व सर्व परवाने मिळविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मेहनत घेतली आहे. स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून भारत अत्युच्च दर्जाचे काम करू शकतो हे जगाला दाखवून द्यावे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मेटे म्हणाले की, भावी पिढीस प्रेरणा मिळावी व मार्गदर्शन व्हावे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा सुरू होता. जगातील अद्वितीय व एकमेव असे हे स्मारक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने या स्मारकासाठी अतिशय तत्परतेने काम करत सर्व परवाने मिळविल्या आहेत. स्मारकाचा अतिशय सुंदर आराखडा तयार करण्यात आला आहे. या स्मारकाचा गौरवपूर्ण उल्लेख पुढील काळात देशाचा नकाशात होईल.

पर्यटनमंत्री रावल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचे काम जलदगतीने सुरु व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्परतेने काम पूर्ण केले. जगातील आगळावेगळा पुतळा येथे उभारण्यात येणार आहे. हे स्मारक म्हणजे सर्वोकृष्ट पर्यटन केंद्र होणार आहे. जागतिक किर्तीच्या या स्मारकामुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळून रोजगार संधी निर्माण होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम कमी खर्चात व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केला.

एल अँड टी कंपनीचे संचालक सतीश म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम करण्यास मिळणे हे आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार असून हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. ठरलेल्या कालावधीपेक्षा लवकर स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरदृष्टिकोन ठेवून कामे सुरू केली आहेत.

 

Previous articleस्वीय सहायकाची बनावट ऑडीओ क्लिप व्हायरल करून पंकजा मुंडे यांच्या बदनामीचे षडयंत्र !
Next articleविद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here