नारायण राणेंनी अगोदर ” ऑफर” स्वीकारू द्या मग बघू !
मुंबई : भाजपने माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणेंना दिलेल्या राज्यसभेच्या ऑफरबाबत शिवसेनेने “थांबा आणि वाट बघा” अशी भूमिका घेत त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाला विरोध केला आहे. अगोदर त्यांनी भाजपने दिलेली ऑफर स्वीकारू द्या, मग काय ते पाहू अशी प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा पहिल्यापासुनच विरोध केला आहे. त्यामुळे भाजपने राणेंना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमधून अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. राज्यसभेच्या एकूण सहा जागा पैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येत आहेत. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा सहज निवडून येवू शकतात. त्यामुळे या तीन जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर इतर दोन जागांसाठी केंद्रियमंत्री प्रकाश जावडेकर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा आहे. प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून, ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील. तर धर्मेंद्र प्रधान हे विद्यमान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आहेत. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असल्याने, त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली जाणार आहे.
नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करीत एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाच्या आशेवर असणाऱ्या राणेंना आता राज्यसभेवर जावे लागण्याची शक्यता आहे. राणे यांचे नाव भाजपच्या राज्य निवड समितीने निश्चित केल्याचे समजते. त्यामुळे राणे आता काय भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे आहे. भाजपने आपणाला राज्यसभेची ऑफर दिली आहे, पण विचार करुन याबाबत निर्णय घेणार असल्याचे राणे यांनी सांगितले आहे . राज्यसभेच्या उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब केंद्रीय निवड समितीच्या उद्या होणा-या बैठकीत होणार आहे.