सरकारने संभाजी भिडे गुरुजींचे नाव पद्मश्री पुरस्कारासाठी सुचवले होते
माहितीच्या अधिकारातुन माहिती उघड
मुंबई : भीमा कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आणि शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव महाराष्ट्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी सुचवले होते अशी माहिती, माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीत समोर आली आहे.
माहिती अधिकारातुन मिळालेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. २०१६ मध्ये १० मंत्र्यांच्या एका समितीने पद्मश्री पुरस्कारासाठी संभाजी भिडे यांचे नाव सुचवले होते. मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला नव्हता. तरी सुध्दा संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव या मंत्र्यांच्या समितीने सुचवले होते. पुरस्कारासाठी अर्ज न केलेल्या परंतु समितीने नावे सुचवल्यामध्ये भिडे गुरूजींसह, राजाराम भापकर, शंकरबाबा पापलकर, पोपटराव पवार, डाॅ.अनिलकुमार, डाॅ.रूमी फरहन बेहरामजी,डाॅ.अश्विन मेहता, वासुदेव कामत, डाॅ.सदानंद देशमुख,इंद्रदेव सिंग, डाॅ.रागिणी पारेख, आचार्य प्रेमसुरी ईश्वरजी, प्रशांत दामले, आशा पारेख,मनहर उधास यांच्या नावाचा समावेश होता.
कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराला भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटेच जबाबदार असल्याचे सांगत दलित संघटनांकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अशात आता भिडे गुरुजींना पद्मश्री पुरस्कार देण्यासाठी मंत्र्यांनीच शिफारस केली होती अशी माहिती, माहिती अधिकारात पुढे आली आहे.
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे जबाबदार असल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. २००८ मध्ये संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान या संस्थेने ‘जोधा अकबर’ या चित्रपटाला तीव्र विरोध केला होता. तसेच मिरज-सांगली या ठिकाणी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत लावण्यात आलेल्या पोस्टरवरून वाद झाला होता. त्यावेळी आघाडी सरकारकडे त्यांच्या अटकेची मागणी झाली होती.भिडे गुरुजी हे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोहीम चालवतात.तसेच छ. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे महत्त्व तरुण पिढीला व्याख्यानाच्या माध्यमातून समजावून सांगतात.राज्यातील काही जिल्ह्यांमधील तरूणांवर भिडे गुरूजी यांचा मोठा प्रभाव आहे.