परिचारक यांना पाठिंबा देणा-यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही
मुंबई : आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी विधानपरिषदेत ठराव मांडून त्याला पाठिंबा दिला त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नसून, ते ‘छिंदम उत्सव मंडळा’चे मानकरी आहेत असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.
काय आहे अग्रलेखात –
आमदार परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी ठराव मांडला व पाठिंबा दिला त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते ‘छिंदम उत्सव मंडळा’चे मानकरी आहेत. सीमेवर सैनिकांचे रोजच रक्त सांडत आहे आणि इकडे सैनिकांच्या कुटुंबीयांची असभ्य भाषेत अवहेलना करणाऱ्यांना शेला-पागोटे देण्याचा उपक्रम सुरू आहे. शिवसेना परिचारक यांच्या बडतर्फीचा ठराव विधिमंडळात आणत आहे. जी मातृभूमीची खरी लेकरे व आमच्या जवानांचे ‘देणे’ लागतात ते ठरावास पाठिंबा देतील. ‘ढोंग्यां’चे बुरखे आता फाटतील.