सचिन सावंतांवर हक्कभंग आणणार
आ. राम कदम
मुंबई : रिव्हर मार्च या सामाजिक अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या व्हीडियोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतल्यानंतर सातत्याने खोटे आरोप करीत मुख्यमंत्र्यांच्या बदनामी करण्याचा प्रयत्न सचिन सावंत करीत असल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे प्रदेश भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी म्हटले आहे. तसेच अ-६ या शासकीय निवासस्थानाचा राजकीय पत्रपरिषदेसाठी वापर करण्यापूर्वी त्यांनी राज्य सरकारची परवानगी घेतली होती काय, असाही सवाल उपस्थित केला आहे.
रिव्हर मार्च या संस्थेने नदी शुद्धीकरणाच्या चांगल्या कार्यासाठी आवाहन करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. अशाप्रकारच्या अनेक उपक्रमांना त्यांनी यापूर्वीही सहकार्य केले असल्याने त्यांनी त्याचा स्वीकार केला. चित्रीकरणासाठी परवानगी घेऊनही त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, टी-सिरिजशी काहीही संबंध नसताना वायफळ आरोप करणे आणि नाहक मुख्यमंत्र्यांच्या बदनामी करणे, याबद्दल आपण त्यांच्याविरोधात सभागृहात हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अ-६ हे विरोधी पक्षनेत्यांचे शासकीय निवासस्थान आहे. तेथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रपरिषदा घेताना त्यांनी राज्य सरकारकडून परवानगी घेतली होती काय आणि घेतली असेल तर त्याचा पुरावा तत्काळ सादर करावा, असे आव्हानही दिले आहे.