बोंडअळी, गारपीट व सोयाबिनची नुकसान भरपाई तात्काळ द्या

बोंडअळी, गारपीट व सोयाबिनची नुकसान भरपाई तात्काळ द्या

रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बुलडाणा : बोंडअळीच्या नुकसानीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचीही नुकसान भरपाई नाही, तर गारपीटीने झालेल्या नुकसानीचीही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी त्रस्त असून ही नुकसान भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व नुकसान भरपाई वाढवून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज प्रत्यक्ष भेटीत केली.

भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्या वतीने बुलडाणा येथे ३ मार्च रोजी सुजलाम सुफलाम कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. या कार्यक्रमात रविकांत तुपकरही निमंत्रीत होते. या कार्यक्रमा वेळी रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून चर्चा केली व शेतकऱ्यांसाठी काही मागण्या केल्या. मुख्यमंत्र्यांना दिलेल्य निवेदनात म्हटले आहे की, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कपाशीवर यावर्षी बोंडअळी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बोंडअळीने संपूर्ण कपाशी फस्त केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. शासनाने बोंडअळीचा सर्वे करुन नागपूर हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने नुकसान भरपाईची रक्कम टाकण्यात येईल अशी घोषणा केली होती. तथापि अद्याप बोंडअळीच्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

मागील महिन्यात विदर्भात मोठ्या प्रमाणावर गारपिट झालेल्या शेतकऱ्यांचा कांदा, गहु, हरभरा व फळबागेचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना दिल्या जाईल अशी घोषणा केली होती. मात्र अजूनही गारपिटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शासनाने घोषीत केलेली नुकसान भरपाई ही तुटपूंजी असून कोरडवाहूसाठी हेक्टरी किमान ५० हजार रुपये तर बागायतीसाठी हेक्टरी किमान १ लाख रुपये देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, कर्जमाफीचे भिजत घोंगडे अजुनही पडुन आहे. या कर्जमाफीचे निकष शिथील करुन कर्जमाफीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून आर्थिक मदत करावी या मागणीचे निवेदन रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची बुलडाणा येथील कार्यक्रमात भेट घेवून दिले. यावर मुख्यमंत्री फडणविस म्हणाले की, सरकार या विषयांवर सकारात्मक असून लवकरच शेतकतऱ्यांना मदत दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Previous articleसचिन सावंतांवर हक्कभंग आणणार
Next articleकेरळच्या धर्तीवर राज्यात अन्न सुरक्षा दल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here