२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यांचे गरीब कल्याणाचे धोरण जनतेला भावल्यामुळे पूर्वोत्तर भारतातील जनतेने मोदीजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीला विजयी केले आहे. त्रिपुराप्रमाणेच आगामी कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केला.
त्रिपुरा व नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
त्यांनी सांगितले की, पूर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयच्या भाजपा कार्यकर्त्यांचे महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो.
मुख्यमंत्री म्हणाले की, मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर‘ॲक्ट ईस्ट’ धोरण स्वीकारून पूर्वोत्तर राज्यांच्या विकासावर भर दिला. त्या राज्यांसाठी अर्थसंकल्पात जादा तरतूद केली. त्या राज्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्या राज्यांमध्ये भारताशी एकात्मतेचा भाव निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले. मोदींनी विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले असतानाच अमित शाह यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे तेथील संघटना बळकट झाली तसेच युवाशक्ती भाजपाशी जोडली गेली. पूर्वोत्तर राज्यांमध्ये आदिवासी समाजाची मोठी संख्या असून आदिवासी समाजानेही भाजपावर विश्वास दाखविला.
त्यांनी सांगितले की, मोदींचे नेतृत्व आणि भाजपाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना हा निवडणूक निकाल म्हणजे डोळ्यात झणझणीत अंजन आहे. गेल्या तीस चाळीस वर्षांत कोणत्याही पक्षाला मिळाले नव्हते एवढे जनसमर्थन मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मिळाले आहे. पूर्वोत्तर राज्यांतील या निकालामुळे देशाच्या इतिहासाला नवे वळण मिळाले आहे.