त्या क्लिप संबंधी स्वतः धनंजय मुंडेंचीच पोलीसात तक्रार
आवाजाची नक्कल करून बनावट ध्वनिफित केल्याचा आरोप
परळी : मागील तीन दिवसांपासुन व्हॉट्सअप व इतर सोशल मिडीयाद्वारे फिरणारी ऑडिओ क्लिप ही आपल्या आवाजाची नक्कल करून बनावट रित्या तयार केली असल्याची तक्रार स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनीच परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी माझी बदनामी करण्या करीता व समाजातील आपली प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टीने बनावट ध्वनिफित बनवुन तिचा प्रचार व प्रसार करणार्या अज्ञान व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मागील तीन दिवसांपासुन समाज माध्यमाद्वारे एक ऑडिओ क्लिप फिरत असुन त्यात धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांबद्दल काही शब्द बोलल्याचा उल्लेख आहे. सदर ध्वनिफित ही आपल्या आवाजाची नक्कल करून बनवण्यात आली आहे. त्यामागे आपली समाजातील प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश आहे. सदर ध्वनिफितीतील आवाज आपला नसुन कोणी तरी अज्ञात व्यक्तीने आपल्या राजकिय विरोधकांशी संगनमत करून आपल्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे म्हटले आहे. आपण कोणाही बद्दल अपशब्द वापरले नसल्याने सदर बनावट ध्वनिफित प्रकरणाची सखोल चौकशी करावी, सदरील ध्वनिफित फॉरेनसिक प्रयोगशाळेकडे पाठवुन आवाज कोणाचा आहे. हे शोधुन त्याचे विरूध्द भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीत केली आहे.
या प्रकरणी वाल्मिक कराड यांनी ही अशाच प्रकारे आणखी एक फिर्याद परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अज्ञात व्यक्ती विरूध्द धनंजय मुंडे यांच्या आवाजाची बनावट क्लिप करून बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.