परिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
शिवसेनेची मागणी
मुंबई : सैनिकांबद्दल अपशब्द काढणारे प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या शिवसेनेने परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधानसभेत केली. या मुद्द्यावर शिवसेनेने गोंधळ घातल्याने दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या आक्रमक सदस्यांनी कामकाजाला सुरूवात होताच परिचारक यांच्या निलंबनाला मुद्दा लावून धरत त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुनिल प्रभु यांनी केली.या मुद्यावर गदारोळ झाल्याने प्रथम १५ मिनिटासाठी तर दुस-यांदा ३० मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.या मागणीसाठी शिवसेनेच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले. परिचारक यांचा मुद्दा लावून धरण्याचा आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याने हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.