प्रशांत परिचारक यांचा गुन्हा देशद्रोहापेक्षाही गंभीर
विखे पाटील
मुंबई : विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सिमेवर लढणाऱ्या जवानांचा केलेला अवमान देशद्रोहापेक्षाही गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांचे विधीमंडळ सदस्यत्व रद्द केले पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली.
आमदार परिचारक यांच्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, आमदार प्रशांत परिचारक यांच्या विधानाबद्दल संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जातो आहे. अनेक सैनिकांनी आमच्याकडे यासंदर्भात तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे परिचारक यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
या मुद्यावर शिवसेनेने केलेल्या घोषणाबाजीवर ते म्हणाले की, सरकार म्हणून शिवसेना साफ अपयशी ठरली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात ते कमी पडले आहेत. त्यामुळे राज्याचे लक्ष इतरत्र वळवून आपले अपयश झाकण्यासाठी त्यांना अशा मुद्यांवर गोंधळ घालण्याशिवाय पर्याय नसल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.