सरकारचे मंत्री मुद्यांऐवजी गुद्यांवर; राज्यात लोकशाही नाही ठोकशाही

सरकारचे मंत्री मुद्यांऐवजी गुद्यांवर; राज्यात लोकशाही नाही ठोकशाही

मुंबई  : भाजपनं संसदीय परंपरेच्या सर्व मर्यादा पार केल्या असून विधान परिषद सभागृहनेते चंद्रकांतदादा पाटील हे आज सदस्यांच्या अंगावर धावून गेले. सभागृह चालवण्याची जबाबदारी असलेले सरकारचे ज्येष्ठ मंत्री सभागृहात मुद्यांऐवजी गुद्यांवर येत असतील तर राज्यात लोकशाही नाही तर ठोकशाही आहे. सत्तारुढ भाजपच्या या ठोकशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज व्यक्त केली.

विधीमंडळाचे कामकाज लोकशाही पद्धतीने चालत नसून सत्तारुढ भाजपाकडून सदस्यांच्या हक्कांवर अतिक्रमण होत आहे, विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे वागत आहेत. यासंदर्भातील विरोधी पक्षांची भूमिका मांडण्यासाठी दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना श्री. मुंडे यांनी सत्तारुढ पक्षाच्या सभागृहातील भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली.

मुंडे यावेळी म्हणाले की, विधान परिषदेतील भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनासंदर्भातील ठराव शिवसेनेने मांडल्यानंतर सत्तारुढ भाजपचे आमदार आणि सभागृहनेते चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहाच्या मर्यादा भंग करणारी वर्तणूक केली. सभागृह चालवण्याची जबादारी विरोधी पक्षांसह सर्वांची असली तरी सत्तारुढ पक्षाची अधिक असते, याचे भान सभागृहनेत्यांना राहिले नाही. ते सदस्यांच्या अंगावर धावून गेले, मुद्यांवरुन गुद्यांवर आले. सभागृह नेत्यांच्या त्या कृतीचा मी निषेध करत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणातील फोलपणा उघड होऊ नये, त्यावरीच चर्चा टळावी, यासाठीच कदाचित हा डाव खेळला असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

विधानसभेतील कामकाजाशी आपला थेट संबंध नाही, परंतु त्या सभागृहात आपल्या आवाजाची नक्कल असलेल्या कथीत ऑडिओ क्लिपचा उल्लेख करुन गदारोळ करण्याचा प्रयत्न झाला. ती क्लिप बोगस असून ती बनवणाऱ्यांविरुद्ध आपण परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असेही  मुंडे म्हणाले.

राज्यातील सरकारला साडेतीन वर्षे झाली आहेत. या साडेतीन वर्षात कोणतीही भरीव कामगिरी सरकारने केली नाही. हे अपयश झाकण्यासाठी तसेच विरोधकांच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी, सभागृहातील कामकाजापासून सरकार पळ काढत आहे, असा आरोपही  मुंडे यांनी केले.

Previous articleप्रशांत परिचारक यांचा गुन्हा देशद्रोहापेक्षाही गंभीर
Next articleमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या मागण्या मान्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here