परिचारकांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची शिवसेनेची मागणी
शिवसेनेचा सभात्याग
मुंबई : सैनिकांबद्दल वादग्रस्त विधान करणारे आमदार प्रशांत परिचारकांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आज दुस-या दिवशीही शिवसेनेने लावून धरली.परिचारकांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीवरून विधानसभेत सभात्याग केला.
सैनिकांबाबत आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन गेल्या आठवड्यात मागे घेण्यात आले होते. मात्र याला विरोध करीत शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक होण्याचे आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्यानंतर हा मुद्दा शिवसेना लावून धरला आहे.आज विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात होताच प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्याची मागणी करत त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली.त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांना कठोर शिक्षा द्यावी,अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी केली.यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी वेलमध्ये जावून प्रशांत परिचारक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय येथे घेता येणार नाही असे सांगितले. शिवसेनेचे सदस्य आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाच्या भावना तीव्र असून याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी करत याप्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकाच विचाराचे असल्याचे सांगितले.