जग जिंकण्याच्या इच्छेने जे सिंकदरचे झाले ते तुमचं होवू नये

जग जिंकण्याच्या इच्छेने जे सिंकदरचे झाले ते तुमचं होवू नये

धनंजय मुंडेंचा सरकारला टोला

धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करताना सरकारचे काढले वाभाडे …

मुंबई :  याद रख सिंकदर के हौसले तो आली थे…जब गया था दुनिया से दोनो हात खाली थे…अशा शब्दात भाजप सरकारला सुनावतानाच अशी अवस्था सरकारची झाली असल्याचा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना केला.

भाजप सरकारच्या कारभारावर हा प्रसिद्ध शेर यावेळी धनंजय मुंडे यांनी सभागृहात ऐकून दाखवला. सिंकदर जग जिंकत गेला. भाजपही एक एक राज्य जिंकत जात आहे. पण सिंकदरने एक चुक केली. जिंकलेले राज्य सांभाळण्याची व्यवस्था त्यांनी केली नाही. त्याप्रमाणेच भाजप जिंकत तर आहे, पण राज्य कसे चालवावे? हे त्यांना कळत नाही. म्हणूनच जग जिंकण्याच्या इच्छेने जे सिंकदरचे झाले ते तुमचं होवू नये असा सल्लाही धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला.

अर्थसंकल्पातील राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार मानताना विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी खेद व्यक्त केला. राज्यपालांनी ऊर भरुन यावे अशी सुरुवात राज्यपालांनी अभिभाषणाची केली. या माझ्या महाराष्ट्रात राज्यपालांच्या अभिभाषण सुरु असताना मराठीचा अपमान होत होता.त्याचं दु:ख भोगलं.मराठीचा अनुवाद का झाला नाही.अनुवादक कुणी आणायचा.पहिल्यांदा गलथान काराभारामुळे तावडेंना मराठी अनुवाद करावा लागला.मराठीचा अपमान पाहिला म्हणून खेद व्यक्त करत असल्याचे सांगितले.

आजकाल सरकारमधील लोकांना राग खूप यायला लागला आहे.साडेतीन वर्ष झालीत.राग वाढणार हे स्वाभाविकच आहे.कारण विरोधी पक्ष एकवटतोय म्हणून तो राग आहे असा टोलाही सरकारला लगावला.

२०१४च्या निवडणूकीमध्ये भाजपाने एक चांगली घोषणा केली.छत्रपतींचा आशिर्वाद चलो चले मोदी के साथ असा विश्वास जनतेला दिला गेला.त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करणार आहोत.फरक एवढा झाला की महाराष्ट्रात भाजपाने गडबडीत महाराजांचा अश्वारुढ पुतळयाचे अनावरण,आता अभिभाषणामध्ये फक्त अश्वारुढ पुतळा असा उल्लेख आहे.आता आंतरराष्ट्रीय स्मारक असा उल्लेख नाही.अरे पावलोपावली महापुरुषांचा अपमान करत आहे.राज्यपाल हे मनाने बोलत नाहीत तर सरकारने त्यांना बोलायला लावले आहे असा संतप्त सवालही धनंजय मुंडे यांनी केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकही अजुन झाले नाही. बाबासाहेबांचे विचाराने अनुसरुन राज्यकारभार सुरु आहे.मात्र इंदू मिलमधील बाबासाहेबांचे स्मारकाचे काय झाले.पंतप्रधान मोदी स्वत: भूमीपूजनाला आले. स्मारकाचे काय झाले. त्याचा साधा उल्लेख नाही हा अपमान नाही का? असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.

महात्मा फुले या महापुरुषाने शिक्षणाची कवाडे सगळयांसाठी उघडी केली.त्यांच्या विचाराने हे सरकार चालते असे सांगितले जाते आहे आणि राज्यातील १३०० शाळा बंद करत आहात हा महात्मा फुलेंचा अपमान नाही का? हे सरकार महापुरुषांच्या विचाराने नाही तर स्वत:च्या विचाराने चालत आहे असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये शहीद जवानांचा मुद्दा मांडण्यात आला आहे.सीमेवर शहीद झालेल्या जवानांसाठी स्व. बाळासाहेबांच्या नावाने ‘शहीद सन्मान योजना’ काढली. एका बाजुला सत्ता पक्षाचे सदस्य सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात.ज्यामुळे सभागृह बंद पडते याच्यासारखे दुर्देव नाही.

कर्नाटक सीमेचा प्रश्न आजही प्रलंबित आहे.यावर बोलावं की नाही.दादांचं भिऊ वाटू लागलंय.पण मला बोलावं लागेल. सीमेवरील मराठी बांधव अखंड महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आंदोलन करत आहे. मात्र राज्यातील एक मंत्री कर्नाटकात जावून कर्नाटक गीत गायले. मग राज्यपालांच्या अभिभाषणात त्या मराठी बांधवांचे प्रश्न का मांडता असा संतप्त सवालही केला.

शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाचे साडेतीन वर्षात काय झाले.आजही शिवस्मारकासाठी नियमाप्रमाणे ज्या पर्यावरणाच्याबाबतीतल्या परवानगी घेणे आवश्यक होते. त्या घेतल्या नसल्याचा आक्षेप उच्च न्यायालयाने नोंदवला आहे. आम्हाला शंका आहे की, मराठा आरक्षण जसे न्यायालयीन प्रक्रियेत अडकवले तसेच हे स्मारकसुद्धा असेच रखडले जाईल का?अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

नगरचा उपमहापौर छिंदम महाराजांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ बोलतो.दु:ख वाटते की,भाजपने याबाबत खेदही व्यक्त केला नाही.ना सभागृह नेत्यांनी ना मुख्यमंत्र्यांनी केला.ट्वीटरबाज सरकार आहे,ट्वीटरबाज पक्ष आहे मग झालेल्या गोष्टीबद्दल दिलगिरीही व्यक्त करायला हवी होती. परंतु यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे बेगडी प्रेम दिसले आहे असा टोलाही लगावला.

महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा मुद्दा राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये आला. राज्यपालांनी २०२५ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठेल असे म्हटले आहे.स्वप्न दाखवावे तेपण भन्नाट.रुपया गेला आता आपल्या कृपेने डॉलर येणार आहे आहे. नोटा, पैसा गेल्यानंतर नीरव मोदी परदेशात घेवून गेलेला पैसा पुन्हा २०२५ पर्यंत तो परत घेवून येईल म्हणून हा संदर्भ दिला आहे .

राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे आहे आणि इथे डॉलरचे स्वप्न २०२५ पर्यंतचे दाखवले जात आहे.याचं उदयाचं काही खरं नाही आणि हे २०२५ चं स्वप्न सांगत आहेत.अरे अशी स्वप्न दाखवायचे बंद करा. ज्या सरकारने आर्थिकदृष्टया राज्य डबघाईला आणले तेच सरकार डॉलरचे स्वप्न जनतेला दाखवत आहे.

आकड्यांची जगलरी करुन खोटे लाभार्थी कसे दाखवायचे यामध्ये भाजपचा जगात कुणीच हात धरू शकत नाही. कर्जमाफी मिळत नाही म्हणून शिवसेनेने बँकेसमोर ढोल बडवले, आसूड यात्रा काढली. त्याच शिवसेनेला आज राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाच्या प्रस्तावाला अनुमोदन देण्याची परिस्थिती ओढवली याचे वाईट वाटते. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांना बायकोसहित ऑनलाईन अर्ज भरण्याची अट ठेवली गेली. ऑनलाईनच्या खुट्टीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीला मुकले. सरकारला काय पती – पत्नीला सत्यनारायणाचा प्रसाद वाटायचा होता का? २९ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी झाल्याचा उल्लेख भाषणात आहे. आमची मागणी आहे की २९ लाख शेतकर्‍यांची यादी या सभागृहाला मिळाली पाहीजे अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.

नोटबंदीमुळे ५० हजार कोटींचा तोटा कृ‌षी क्षेत्राला झाला होता. बँका उद्योगपतींना कर्जमाफी देतात मात्र शेतकर्‍यांना पैसे देण्यासाठी सरकार अनुकूल नाही. राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आज राज्यावर ४ लाख १३ हजार कोटी कर्ज झाले आहे. आज राज्यातील प्रति माणसावर ३९ हजार ४०० रुपये कर्ज आहे. व्याजापोटी आपण २७ हजार कोटी रुपये भरत आहोत. सरकारने जनतेला, शेतकर्‍यांना फसवले आहेच. पण आता महामहिम राज्यपालांना चुकीचे भाषण देवून राज्यपालांनाही फसवले आहे. नाऊ युवर काऊंटडाऊन बिगीन्स अशा भाषेत धनंजय मुंडे यांनी सरकारला इशारा दिला.

भाजप आज त्रिपुरा, मेघालय येण्याचा आनंद व्यक्त करत आहे. अजूनही राज्य येतील त्याचा त्यांनी आनंद व्यक्त करावा. मात्र हा महाराष्ट्र पुन्हा भाजपकडे येणार नाही.८० वर्षाच्या धर्मा बाबाचा शाप या सरकारला उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही असा निर्वाणीचा इशाराही मुंडे यांनी शेवटी दिला.

Previous articleवीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात १३२ पोलिस ठाणे
Next articleराज्यात सातवा वेतन आयोग लागू करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here