लाळ्या-खुरकत लसीवरुन पुन्हा एकदा महादेव जानकरांवर माफी मागण्याची नामुष्की
चालू अधिवेशनातच निविदा प्रक्रियेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा – धनंजय मुंडे
अधीवेशन संपण्यापूर्वी चौकशी पूर्ण करा – सभापती यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील दोन कोटी गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांना आवश्यक असलेला लाळ्या-खुरकत आजारावरची लस उशीरा खरेदी प्रक्रिया रखडवल्याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊनही चौकशी झाली नसल्याचा धक्कादायक खुलासा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना फैलावर धरत निविदाप्रक्रियेत घोळ घालून लस खरेदीला उशीर करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तसेच इंडियन इम्युनॉलॉजी या कंपनीकडून २०१६ साली वाढीव दराने लस विक्री केल्याबद्दल ९० लाखांचा दंड आकारला होता. तोच न्याय सातव्या निविदेमध्ये मंजूर केलेल्या बॉयोवेट प्रा. लि. या कंपनीला लावणार का? अशा प्रश्न उपस्थित केला यावर अधिवेशन संपण्याच्या आत चौकशी करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.
दोन दिवसांपूर्वीच विधानसभेमध्ये लाळ्या-खुरकत आजाराच्या लसीवरुन पशुसंवर्धन मंत्र्यांना माफी मागावी लागली होती. तीच नामुष्की आजही त्यांच्यावर धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत ओढवली.
२०१७ मध्ये या लशीच्या खरेदीसाठी तब्बल चार वेळा निविदा काढण्यात आल्या. चौथ्यांदा काढलेल्या निविदेत इंडियन इम्युनॉलॉजी प्रथम पात्र ठरल्यानंतर त्यांना काम देण्याचे निश्चित करण्यात आले मात्र त्यांनी अन्य राज्यात महाराष्ट्रापेक्षा कमी किमतीला निविदा भरल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पाचव्यांना निविदा काढण्यात आली. या निविदेत बॉयोवेट कंपनीला काम देण्याचे ठरले होते. मात्र बॉयोवेट कंपनीने हरयाणाला ज्या दरात लस विकली त्यापेक्षा जास्त दराने महाराष्ट्राला लस विकणार असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
जर ही निविदा प्रक्रिया पारदर्शक होती तर राज्यातील कृषी आयुक्तांनी त्यावर आक्षेप का घेतला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.राज्यातील सुमारे दोन कोटी गाई-म्हशी व शेळ्या मेंढ्यांना लाळ खुरकत आजारावर दर सहा महिन्यांनी एफएमडी (फूड अँड माऊथ डिसीझ) लस दिली जाते. या लशीची निर्मिती करणाऱ्या देशात तीनच कंपन्या असून हा साथीचा आजार वेगाने पसरणारा आहे. या प्रश्नावर आ. सुनील तटकरे , भाई जगताप व इतर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.