औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करा
धनंजय मुंडेंनी केली मागणी
औरंगाबादेत वैद्यकीय आणीबाणी -आमदार सतिश चव्हाण ;शुक्रवारी विशेष चर्चा होणार
मुंबई : गेले २० दिवस औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला असून त्याचे पर्यवसन काल दंगलीमध्ये झाले. त्या घटनेवर आज विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडताना महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केली.
दरम्यान औरंगाबादमध्ये पेटलेल्या कचरा प्रश्नावर आमदार सतिश चव्हाण हेही आक्रमक झाले. त्यांनी औरंगाबादमध्ये वैदयकीय आणीबाणी आली असल्याचे सांगतानाच पोलिसांनीच दंगलीमध्ये वाहने फोडल्याचा गंभीर आरोपही केला. याशिवाय काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांनीही याविषयी सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप केला.
या कचरा प्रश्नामुळे औरंगाबादकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही एक प्रकारची आणीबाणी निर्माण झाली आहे. सेना-भाजपच्या भांडणामध्ये औरंगाबादची वाट लागली असून याठिकाणी प्रशासक नेमा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.
सरकारने स्वच्छ भारत अभियान,स्मार्ट सिटी योजना आणल्या असल्या तरी त्या किती तकलादू आहेत. याचा बुरखाच औरंगाबादच्या कचरा प्रश्नाने फाडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेचा कचरा नरेगाव येथे टाकण्यावरून आंदोलन चालू आहे. काल या आंदोलनाला हिसंक वळण लागून पोलिसांनी गोळीबार केला. या राज्यात आता कोणीही आंदोलन केले तरी सरकार त्यांच्यावर गोळीबार करणार आहे ?शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्यांच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
मराठवाडयाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातलाच कचर्याचा प्रश्न सोडवता येत नसेल तर या सरकारला लाज वाटली पाहीजे. गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेत ज्यांची सत्ता आहे,त्यांची ही जबाबदारी असल्याचे मुंडे म्हणाले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रश्नाची दखल घेवून महानगरपालिका बरखास्त करायला सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी नरेगाव ऐवजी खदानीमध्ये कचरा टाकण्यासाठी सांगितले आहे. पण खदाणीसाठी ज्या मार्गावरून जावे लागते, त्या मार्गालगतच्या गावांनीही कचर्याचा एकही ट्रक जावू देणार नसल्याचे सांगितले आहे. या गंभीर प्रश्नांवर सभागृहात चर्चा करण्यासाठी २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उत्तर दिले व यावर उद्या चर्चा करण्याचे मान्य केले.