राज्यातील शिक्षण खात्याला ‘विनोदा’च्या तावडीतून वाचवा
अजित पवार
मुंबई : राज्यात शिक्षणाचा ‘विनोद’झाला असून या ‘विनोदा’च्या तावडीतून शिक्षण खात्याला सोडवा असे आवाहन करतानाच शिक्षण व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्याला विनोद तावडे जबाबदार असून ते हा विभाग हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्या या चुकांमुळेच राज्यातील लाखो विदयार्थ्यांचे नुकसान झाले असल्याची जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शिक्षणाच्या विषयावर बोलताना केली.
राज्यातील शिक्षण विभागाला लागलेल्या उतरत्या कलेवर बोलताना अजित पवार यांनी शालेय शिक्षण मंत्री आणि त्यांच्या विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील शिक्षकवर्ग,तरुण-तरुणी वर्ग अस्वस्थ झाला आहे.प्रत्येकाला आपल्या भविष्याचे काय ही चिंता सतावत आहे मात्र याकडे शिक्षण विभाग कसा दुर्लक्ष करत आहे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांबाबत योग्य निर्णय नाही. संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे आणि वाढत्या दबावामुळे त्यांच्यातील कायम हा शब्द काढण्यात आला. गेली ४५ वर्ष इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान मिळत नाहीय. त्यामुळे त्यातील शिक्षकांना भरमसाठ फी प्रमाणे मानधन मिळत नाही. त्यामुळे त्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे निधी दयावा, याकडेही शालेय शिक्षणमंत्र्यांचे लक्ष नाही. तावडे दुर्देवाने चांगले धोरण राबवत नाहीयत. ग्रामीण भागातील शाळांना पायाभूत सुविधा मिळत नाहीयत. आज शिक्षणमंत्री लक्ष देत नसल्यामुळे राज्यातील लाखो विदयार्थ्यांचे नुकसान होत आहे असा आरोपही दादांनी केला.आज टिचिंग-नॉनटिचिंग स्टाफ सारखे संपावर जात आहेत. शिकवण्यापेक्षा आपलं भवितव्य काय आहे याचा विचार ते शिक्षक करत आहेत. आज राज्यातील शिक्षक भवितव्यासाठी अस्वस्थ आहेत, विदयार्थ्यांना फी मिळणार की नाही याची शाश्वती नाही अशी भयावह स्थिती राज्यात असल्याचे दादांनी सांगितले.
शिक्षणसंस्था चालवणाऱ्यांची मी बाजु घेणार नाही परंतु चुका करत असलेल्या संस्थावर कारवाई करा. आज तर काहीजणांनी संस्था विकायला काढल्या आहेत. या संस्था कशा विकतात तर विश्वस्तांचीची बोली लागत आहे.शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा अधिकार सरकारला नाही आणि कुणालाही नाही असे ठणकावून दादांनी यावेळी सांगितले.राज्यात बायोमेट्रीक पध्दत आणा जेणेकरुन बोगसपणा घडणार नाही. खऱ्या आणि हुशार विदयार्थ्यांना न्याय मिळेल अशी मागणीही दादांनी केली.
बेरोजगारीवर बोलताना दादांनी २०१७ मध्ये साडेतीन हजार कारखाने बंद पडले आहेत. नवीन नोकऱ्या मिळणे दुरापास्त झाले आहे. दुष्टचक्रामध्ये राज्यातील तरुण-तरुणी अडकले आहेत. तरी सरकारला त्याचे गांर्भिय नाही.शिक्षणाचा विनोद झाल्याचा टोला लगावताना दादांनी विनोद तावडे यांना मंत्रीमंडळ अस्तित्वात आले त्यावेळी गृहमंत्रीपद हवे होते परंतु त्यांना ते मिळाले नाही त्यामुळेच ते शिक्षणाकडे लक्ष देत नाहीत असा चिमटाही काढला.
आज राज्यात बोगस पदव्या, कॉपी प्रकरण, शिक्षकांना न्याय नाही, त्यांच्या भरत्या नाहीत, डीटीएड, बीएड विदयार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीयत, माध्यमिक, उच्चमाध्यमिक विभागात शिक्षक नेमणूका होत नाहीयत, वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक नेमले जात नाहीयत, व्यवसाय अभ्यासक्रमामध्येही नेमणूका नाहीत, अर्धवेळ शिक्षक, शिष्यवृत्ती, मालमत्ता कराबाबत अडचणी आहेत, विदयुत धोरण नाही, मुख्याध्यापकांच्या नेमणूका नाहीत, इयत्ता १ ते ८ वीपर्यंतचा अभ्यासक्रमाकडे लक्ष नाही, आश्रमशाळांमध्ये शिक्षक नाहीत अशा कितीतरी विषयांकडे सरकारचे लक्ष नाही. अक्षरश:शिक्षणविभागाचा बोजवारा उडाला आहे. याला दिशा मिळायला हवी असेही दादा म्हणाले.