किसान मोर्चाला सरकारचे चर्चेचे निमंत्रण
मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी किसान मोर्चातील शेतकऱ्यांची विक्रोळीत भेट घेत स्वागत केले आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा घडवून आणू असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले आहे तर ; लेखी आश्वासना दिल्याशिवाय माघार घेणार नाही, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
लेखी आश्वासनाच्या मागणीवर चर्चा करण्यात येवून आणि सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास जलसंपदामंत्री महाजनांनी व्यक्त केला.
कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेचा निघालेला शेतक-यांचा मोर्चा मुंबईत धडकला आहे. किसान मोर्चा आज आझाद मैदानात मुक्काम असेल तर उद्या सोमवारी सकाळी विधान भवनाला घेराव घालणार आहे.मनसेने या मोर्चाला पाठिंबा दिला असून, राज ठाकरे शेतकरी मोर्चाच्यामध्ये सामील झालेल्या शेतक-यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी सोमैय्या मैदान, चुनाभट्टी-सायन येथे राज ठाकरे त्यांची भेट घेतील. शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी उद्या या मोर्चात सामील होणार आहेत.