शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहचेल
शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात बहुजन समाजाला फक्त शिक्षण नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहीजे, यासाठी गेल्या काही वर्षात सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात १६ व्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र आज क्रमांक ३ वर पोहचला असून, नजिकच्या काळात शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहचेल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज व्यक्त केला.
विरोधी पक्षांनी विधासभेत नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या प्रश्नावर शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सविस्तर उत्तर दिले. कमी होत चाललेल्या पटसंख्येच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन नजिकच्या शाळेत केल्यास त्या विद्यार्थ्यांचे समाजीकीकरण योग्य प्रकारे होईल व त्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्याची संधी मिळेल, ही शासनाची भूमिका आहे.
१० पटसंख्या असलेल्या १३०० शाळा बंद करण्याचा मुद्दा अनेक सदस्यांनी उपस्थित केला. परंतु याबाबतची वस्तुस्थिती मात्र जाणून न घेता, अनेक सदस्यांनी आपले म्हणणे मांडले. यासंदर्भात बोलताना श्री. विनोद तावडे म्हणाले की, पटसंख्या १० आणि १० पटसंख्या खालच्या एकुण ५ हजार ६०० शाळा आहेत. त्यापैकी १२९२ शाळाची निवड करण्यात आली आहे. यापैकी १ कि.मी. परिसरात दुसरी शाळा असल्याने ५६८ शाळा समायोजित करण्यात आल्या असून ३४१ शाळा या डांबरी रस्ता व पायवाट, १ किमी. पेक्षा जास्त अंतर अशा स्वरुपाच्या आहेत. या ठिकाणी वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या शाळा समायोजित करण्यात आलेल्या नाहीत. तसेच ३८३ शाळा या समायोजित करण्यामध्ये अनेक अडचणी असून तेथील शिक्षणाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी चर्चा करुन, त्यांचे अभिप्राय घेण्यात येतील, त्यामुळे या शाळांचे अद्यापही समायेाजन करण्यात आलेले नाही. दूर डेांगराळ, आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम आम्ही करीत आहोत. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.