राज्यात तब्बल वीस नवीन वसतिगृहांसह निवासी शाळांच्या बांधकामास मंजुरी

राज्यात तब्बल वीस नवीन वसतिगृहांसह निवासी शाळांच्या बांधकामास मंजुरी

तब्बल दोन हजार मुलामुलींच्या निवासाची सोय- राजकुमार बडोले

मुंबई : अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभाग तत्पर असून त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी निवासाच्या सोयी निर्माण व्हाव्यात यासाठी या वर्षी राज्यात तब्बल वीस नवीन वसतिगृहांसह निवासी शाळांच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या वसतिगृहात दोन हजार विद्यार्थी विद्यार्थीनींच्या निवासाची सोय होणार आहे, असे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागाची राज्यभरात एकूण ४३१ वसतिगृहे आणि ८३ निवासी शाळा असून यामध्ये तब्बल ७० हजार ५०० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय आहे. तरीही दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करतात.  मात्र वसतिगृहांची संख्या मर्यादित असल्यामुळे सर्वांनाच शासकिय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, त्यामुळे बऱ्याचदा गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे आम्ही प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी १०० विद्यार्थी संख्या असलेली वसतिगृहे नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यावर्षी २० वसतिगृहांचे बांधकाम करण्यास मंजूरी दिली आहे. सदर निवासी शाळांपैकी सोलापूर, हिंगोली, बुलढाणा, नागपूर,सातारा, या जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर जळगाव, वाशिम, वर्धा, नांदेड, उस्मानाबाद, जालना, रत्नागिरी, लातूर, धुळे आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एका वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे, असे बडोले यांनी सांगितले.

खे़डे गावातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांमध्ये शिक्षणाची प्रचंड ओढ असल्याचे दिसते.  हा घटक आर्थिक दृष्ट्या खूप मागास आहे. उत्पन्नाच्या पुरेशा साधनांपासून ते वंचित असतात. अलिकडेच केलेल्या पाहणीत अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील ९० टक्के लोक भुमिहिन आहेत, तर उर्वरित दहा टक्के लोकांमध्येही अल्पभूधारक मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे या घटकांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसतिगृहे आणि निवासी शाळा उभ्या करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे ते म्हणाले.

आधुनिक काळातील शैक्षणिक आणि इतर स्पर्थांमध्ये टिकाव धरू शकतील असे दर्जेदार शिक्षण अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी वसतिगृहात आधुनिक शैक्षणिक सोयी सुविधा तसेच निवासाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. गुणवंत विद्यार्थी घडवण्यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांची भुमिका मोठी आहे. गेल्या अनेक दशकात याच वसतिगृहांनी अनेक आएएएस, आयपीएस, डॉक्टर, वकिल, प्राध्यापक, लेखक, पत्रकार, विचारवंत, तसेच अनेक राजकिय नेत्यांना जन्माला घातले आहे. अनेक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळींचे केंद्र वसतिगृहे राहिलेली आहेत. वसितगृहांची उभारणी करून आम्ही सामाजिक पुण्याचे काम करीत असल्यामुळे समाधान वाटते असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.

Previous articleराज्यसभेची निवडणूक बिनविरोध
Next articleदमबाजी करणारा अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी निलंबित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here