दमबाजी करणारा अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी निलंबित

दमबाजी करणारा अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी निलंबित

धनंजय मुंडे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मंत्री गिरीष बापट यांची घोषणा

मुंबई :  विधानपरिषदेत गुटखा बंदीचा विषय का मांडला म्हणुन विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयात येऊन दमबाजी करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन खात्याचा अन्न सुरक्षा अधिकारी आर.डी. आकरूपे यास निलंबित करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व सभागृहातील आमदारांच्या आक्रमक पावित्र्यानंतर घेतली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागील आठवड्यात धनंजय मुंडे यांनी राज्यातील गुटखा बंदीचा विषय लक्षवेधी द्वारे उपस्थित केला होता. याप्रकरणी खात्याचे अधिकारी व गुटखा तस्कर यांचे संबंध असल्याने याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मुंडे यांनी केली होती. त्यावर या प्रकरणाच्या सुरूवातीला दक्षता पथकामार्फत व त्यानंतर समाधान न झाल्यास सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. या चौकशीमुळे खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यातुनच यातील एक दोषी अधिकारी आर.डी. आकरूपे याने एका भाजपा आमदारासह मुंडे यांच्या कार्यालयात येऊन, गुटखा बंदीचा विषय का मांडला म्हणुन गुरूवारी तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली.

आज याबाबत धनंजय मुंडे यांनी सभागृहात विषय उपस्थित करून सरकारला विरोधी पक्षाचा आवाज बंद करायचा आहे काय? या अधिकाऱ्याची अशी हिंम्मतच कशी होते? असा प्रश्न उपस्थित करीत त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनिल तटकरे , आ.जयंत पाटील, आ.कपिल पाटील, आ.जयवंतराव जाधव यांनी हा विषय लावुन धरल्याने सभागृहाचे कामकाज गोंधळामुळे दोन वेळा बंद करावे लागले. सभापतींनी या घटनेची गंभीर दखल घेत सरकारला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केल्याची घोषणा बापट यांनी केली.

Previous articleराज्यात तब्बल वीस नवीन वसतिगृहांसह निवासी शाळांच्या बांधकामास मंजुरी
Next articleगुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी