उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच शिक्षकांचे पगार
शिक्षण मंत्री विनोद तावडे
मुंबई : शिक्षकांच्या पगारासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पालन करण्यास राज्य सरकार बांधिल आहे. न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत उपलब्ध झाल्यानंतर विधी व न्याय खात्याच्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. परंतू शिक्षकांची पूर्वीच्या बँकेतील खाती नवीन खात्यामध्ये बदलण्याची प्रक्रिया सुरु असून त्यासाठी थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे ठाण्यामध्ये शिक्षकांचे पगार काढण्यात आले तसे येथील शिक्षकांचे पगार काढता येईल व त्यानंतर उच्च न्यायालायाच्या आदेशानुसार पगार काढण्यात येतील, पण कपिल पाटील यांचाच हट्ट आहे की, आताच युनियन बॅंकेतून पगार काढा, त्यामुळे केवळ राजकीय भांडणासाठी हेच शिक्षकांचा छळ करीत आहेत आणि माझ्यावर आरोप करीत आहे असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानभवनात प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
शिक्षकांचे पगार होणे महत्त्वाचे आहे, कोणत्याही शिक्षकांचे नुकसान होणार नाही आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होईल याची काळजी सरकार घेईल व शिक्षकांचे पगार निघतील असे स्पष्ट करतानाच विनोद तावडे यांनी सांगितले की, शिक्षकांच्या हिताला प्राधान्य देण्याचीच राज्य सरकारची भूमिका आहे, पण काही जण फक्त निवडणूका जवळ आल्यामुळे ही राजकीय नौटंकी करीत असून काहीतरी खोटेनाटे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.