राज ठाकरे आज कोणती घोषणा करणार ?
मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर मनसेच्यावतीने ‘पाडवा मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असून,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांनी फेसबुकवर व्यंगचित्रे प्रसिध्द करून अनेकांचा खरपूस समाचार घेतला आहे. तर; पुण्यात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली जाहीर मुलाखत त्यानंतर काल राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट, या पार्श्वभूमीवर आज होणा-या पाडवा मेळाव्यात देशासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत ते कोणती भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मनसेकडून जय्यत तयारी सुरु असून, मेळाव्याला गर्दी व्हावी यासाठी समाज माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. तसेच मुंबई शहरात आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात पोस्टरही लावण्यात आली आहेत.
नाशिकहून निघालेला किसान मोर्चा आझाद मैदानात धडकला होता. या मार्चाला राज ठाकरे यांनी जाहीर पाठींबा देत, सायन येथील सौमय्या मैदनात त्यांनी मोर्चेकरांची भेट घेतली होती.हे सरकार तुमचे प्रश्न सोडवणार नाही, माझ्या हातात सत्ता देऊन पहा तुमचे प्रश्न सुटतात की नाही, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते. त्यामुळे राज ठाकरे हे आजच्या आपल्या भाषणात राज्य सरकारचा खरपूस शब्दात समाचार घेण्याची शक्यता असून, चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय यावरून ते शिवसेनेवर ही हल्ला चढविण्याची शक्यता आहे. तर राज ठाकरे हे आज कोणती नवी घोषणा करणार याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांसह, राजकिय पक्षांचेही याकडे लक्ष लागून राहिले आहे.