सुमारे २ हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात पोहोचली अस्मिता योजना
अस्मिता योजनेसाठी वितरक म्हणून २ हजार ३७२ बचतगटांची नोंदणी
अस्मिता फंडालाही लोकांचा प्रतिसाद
मुंबई : अस्मिता योजनेतून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी वितरक म्हणून मागच्या अवघ्या एका आठवड्यात २ हजार ३७२ बचतगटांनी नोंदणी केली आहे. या माध्यमातून हे बचतगट कार्यरत असलेल्या साधारण २ हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात ही योजना पोहोचली आहे. अस्मिता फंडालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ११ हजार ४३९ मुलींच्या सॅनिटरी नॅपकीनसाठी ५१८ जणांनी स्पॉन्सरशीप स्विकारली आहे. यातून सुमारे २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
किशोरवयीन मुलींना फक्त ५ रुपयांत तर महिलांना स्वस्त दरांत सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणे तसेच त्याच्या वितरण व्यवसायातून बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दुहेरी उद्देशाने नुकताच जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकीनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या मोबाईल अॅपवर नोंदणी करण्यासाठी मागील आठ दिवसांत बचतगटांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॅनिटरी नॅपकीनचे वितरक म्हणून काम करण्यासाठी दोन दिवसांपुर्वी सायंकाळपर्यंत २ हजार ३७२ बचतगटांनी या अॅपवर नोंदणी केली आहे. लवकरच राज्यातील प्रत्येक गावांतील किमान एक बचतगट या अॅपवर नोंदणीकृत होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व्यापक प्रयत्न करीत आहे. बचतगटांची नोंदणी झाल्यानंतर लगेच सॅनिटरी नॅपकीनची प्रत्यक्ष विक्री सुरू केली जाणार आहे.
दोन दिवसांपुर्वी सायंकाळपर्यंत जिल्हावार पुढीलप्रमाणे बचतगटांची नोंदणी झाली आहे. अहमदनगर ११०, अमरावती ६, औरंगाबाद ८२, बीड १३४, भंडारा २३, बुलढाणा १४९, चंद्रपूर ३०२, धुळे ७६, गडचिरोली ९, गोंदीया ३१, हिंगोली १३, जळगाव १६५, जालना २८, कोल्हापूर ८६, लातूर ४१, नागपूर ४८, नांदेड २७, नंदुरबार २९, नाशिक ३०, उस्मानाबाद ६४, पालघर ५०, परभणी ५१, पुणे २९, रायगड १९, रत्नागिरी ६८, सांगली ४३, सातारा ९४, सिंधुदूर्ग ३८, सोलापूर १२९, ठाणे १२, वर्धा ३२८, वाशिम १७, यवतमाळ ४१. मागील दोन दिवसात या संख्येत अजून वाढ झाली आहे.
सॅनिटरी नॅपकीन वापराचे प्रमाण पहिल्या वर्षी १७ वरुन ७० टक्क्यांवर नेण्याचे उद्दीष्ट – मंत्री पंकजा मुंडे
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीन वापराचे प्रमाण सध्या फक्त १७ टक्के इतके आहे. पहिल्या वर्षात ग्रामीण भागात हे प्रमाण ७० टक्के इतके करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. म्हणजे पहिल्या वर्षात ग्रामीण भागातील सुमारे १.५ कोटी मुली आणि महिलांपर्यंत सॅनिटरी नॅपकीन पोहोचविण्याचा आमचा ध्यास आहे. तसेच दुसऱ्या वर्षी ग्रामीण भागातील १०० टक्के किशोरवयीन मुली आणि महिलांपर्यंत सॅनिटरी नॅपकीन स्वस्त दरात पोहोचविण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. या योजनेला सध्या मिळत असलेला प्रतिसाद पाहता आम्ही निश्चितच हे उद्दीष्ट पूर्ण करु, असे त्यांनी सांगितले.
अस्मिता रथाचे राज्याच्या विविध भागात स्वागत
महिलांच्या मासिक पाळीविषयक विविध अंधश्रद्धा, गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने राज्याच्या विविध भागातून सध्या २ अस्मिता रथ फिरत असून त्यामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. पालघर, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर या जिल्ह्यात मुली आणि महिलांनी अस्मिता रथाचे उत्फुर्त स्वागत केले. आज हे अस्मिता रथ नांदेड आणि रत्नागिरी जिल्ह्यात असून उद्या सोमवारी यवतमाळ आणि रायगड जिल्ह्यात अस्मिता रथ जनजागृती करणार आहेत. त्यानंतर हे रथ पुढील जिल्ह्यात जनजागृतीसाठी जाणार आहेत. यासोबतच जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट दाखविण्याची मोहीम जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येत असून येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व मुलींना हा चित्रपट दाखविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नरत आहे.
योजनेची पार्श्वभूमी – मुलींना फक्त ५ रुपयांत ८ सॅनिटरी नॅपकीन
अस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना २४० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट ५ रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील साधारण ७ लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहेत. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना ५ रुपयांप्रमाणे विक्री केलेल्या पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रती पॅकेट १५.२० रुपये इतके अनुदान शासन बचतगटांना देणार आहे. किशोरवयीन मुलींना वर्षभरात १३ पाकीटे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महिलांना २४० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट २४ रुपयांना तर २८० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट २९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. बचतगट हे वितरकांकडून सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट खरेदी करुन परस्पर विक्री करणार आहेत.