सट्टा किंग अचल चौरासिया पोलिसांचा जावई आहे का ?

सट्टा किंग अचल चौरासिया पोलिसांचा जावई आहे का ?

मुंडेंचा संतप्त सवाल

गेम किंग इंडिया या ऑनलाईन सट्टयावर बंदीसाठी मुंडे यांची लक्षवेधी

मुंबई :  मुंबईत येवून अचल चौरासियाला मध्यप्रदेश पोलिस अटक करतात मग महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाही. तो पोलिसांचा जावई लागला आहे का ? आपल्या गुन्हयात पोलिसांनी चौरासियाला का मागितले नाही. याचं उत्तर मंत्री देत नाहीत. निव्वळ विषयाला बगल देण्याचं काम मंत्री करत असून त्या चौरासिया बंधुंचे समर्थन शासन करत आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी नियम १८७ अन्वये ही लक्षवेधी उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेम किंग इंडिया या नावाने ऑनलाईन साखळी सट्टा चालवून दररोज कोटयवधी रुपयांचा गंडा घालणारा अचल चौरासिया मध्यप्रदेशच्या पोलिसांना सापडतो मात्र महाराष्ट्राच्या पोलिसांना सापडत नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्याला कधी अटक करणार आणि ऑनलाईन वेबसाईट किती तासात बंद करणार याचं उत्तर सरकारने द्यावे अशी मागणी केली.

पत्रकारांनी एखादी माहिती छापली तर ती तुम्हाला कशी आणि कुठुन मिळवली ही माहिती हे हुडकून काढत जेलमध्ये टाकलं जातं मात्र एवढया मोठयाप्रमाणात सट्टा पोलिसांच्या मदतीने सुरु असताना चौरासिया पोलिसांना सापडत नाही याचेच आश्चर्य वाटते असेही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान यावर गृहराज्यमंत्र्यांनी दिलेले थातुरमातुर उत्तर ऐकून चर्चेत भाग घेत शिवसेनेचे आमदार अनिल परबही आक्रमक झाले. या सट्टाप्रकरणात असलेल्या सिनिअर पोलिसांची मी नावे देतो किंवा माझ्यासोबत तुम्ही चला असे कितीतरी गेम तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्यासोबत असलेले पोलिस दाखवतो. त्यांना निलंबित करणार आहात का? असा संतप्त सवाल अनिल परब यांनी केला.

दरम्यान तपास यंत्रणांचे काम नीट नाही किंवा ही यंत्रणा गुन्हेगारीला साथ देत आहे. हे गुन्हे नव्या काळयातील आहेत. केंद्राच्या गृहखात्याचे सहकार्य घेवून स्वतंत्र एसआयटी नेमावी अशी मागणी आमदार हेमंत टकले यांनी चर्चेत भाग घेताना केली.

दरम्यान सायबर गुन्हयाच्याबाबतीत नवीन कायदा आणणार का ? त्या कायदयात अजामीनपात्र गुन्हयाची नोंद व्हावी आणि त्यात कठोर शिक्षा असणार का? अशी मागणीही मुंडे यांनी केली. यावर गृहराज्यमंत्र्यांनी ऑनलाईन सट्टा किंवा लॉटरी चालवून लोकांची फसवणूक करणाऱ्याविरुध्द व जुगाराचा अड्डा चालविणाऱ्याविरुध्द आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Previous articleआगामी काळात राम मंदिराच्या मुद्यावरून हिंदू-मुस्लिम दंगली घडविल्या जातील !
Next articleशिक्षकांचे वेतन तीन दिवसांत होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here