अनुदानवाढीबाबत एका महिन्यात निर्णय घेणार
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा
मुंबई : सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ९०० रुपये अनुदानात वाढ करण्याचा निर्णय येत्या महिनाभरात घेण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधान परिषदेत केली.
यासंबंधीचा तारांकित प्रश्न डॉ. अपूर्व हिरे, हेमंत टकले, हुस्नबानो खलिपे आदी सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात बडोले यांनी सदर घोषणा केली.आमदार हेमंत टकले, हुस्नबानु खलिफे यांनी वसतिगृहातील दिव्यांग मुलांना देण्यात येणारी रक्कम कमी असुन त्यात १५०० रुपयापर्यत वाढ करण्याची मागणी केली. त्यावर बोलताना बडोले यांनी सांगितले की,
अनुदान वाढीबाबत निर्णय घेण्यासाठी आमदारांची समिती गठीत करून एका महिन्यात अनुदान वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल.
सामाजिक न्याय विभागांतर्गत तसेच स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांग व इतर अशा एकूण २ हजार ३८८ अनुदानित वसतिगृहापैकी ६८५ वसतिगृहाकडे मूळ मान्यता आदेश नसल्याने तसेच कागदपत्र पडताळनीचे कारणाने २१ सप्टेंबर २०१५ च्या आदेशान्वये मागील 1 वर्षापासून अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने हा निर्णय मागे घेण्याची मागणी सुनील तटकरे यांनी केली.
अनेक वसतिगृह मूळ आदेश नसल्याने बंद करण्यात आले आहे मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली असून नव्याने ६३७ वसतिगृह निर्मितीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तसेच आता नव्याने २०० वसतिगृहाचे आदेश निर्गमित करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सामाजिक न्याय मंत्र्यांनी स्पष्ट केले.