रेल्वे अॅप्रेंटिस आंदोलनावरील लाठीमाराची चौकशी करा!
विखे पाटील
रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांची रोज आंदोलने
मुंबई : रेल्वे अॅप्रेंटिसच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केली. रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांना रोज आंदोलने करावी लागतात, असेही त्यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी झालेल्या या आंदोलनामुळे मुंबई शहरातील रेल्वे सेवा ठप्प होऊन लाखो प्रवाशांचा खोळंबा झाला होता. विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या गंभीर घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर ते म्हणाले की, केंद्र सरकारने वर्षाला २ कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. परंतु, तरूणांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना आंदोलनांच्या माध्यमातून रोज आपला असंतोष व्यक्त करावा लागतो आहे. राज्यातील हजारो रेल्वे अॅप्रेंटिस आज सकाळी भरतीच्या मागणीसाठी माटुंगा येथे रूळांवर उतरले. ते सातत्याने आपल्या मागण्यांसंदर्भात सातत्याने दाद मागत होते. परंतु, सरकारने वेळीच त्याची दखल घेतली नाही. आज सकाळी आंदोलन झाल्यानंतरही मंत्री किंवा राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तोडगा काढण्याचे प्रयत्न केले नाहीत. वरून त्यांच्यावर अमानुष लाठीमार करण्यात आला, असे सांगून विखे पाटील यांनी यासंदर्भात शासनाने निवेदन करावे, अशी मागणी केली.