युवकांचा धीर सुटत चाललाय, सरकारने आता तरी जागे व्हावे! 

युवकांचा धीर सुटत चाललाय, सरकारने आता तरी जागे व्हावे! 

खा. अशोक चव्हाण

मुंबई : देशातील बेरोजगारीची परिस्थिती विदारक झालेली असून सरकारच्या आटोक्याबाहेर गेली आहे. युवकांचा धीर सुटला आहे. आज मुंबईत हजारो विद्यार्थ्यांना रेल्वे रूळावर उतरून आंदोलन करावे लागले, ही घटना याचे निदर्शक असून सरकारने वेळीच जागे व्हावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, देशात दररोज जवळपास ३३ हजार युवक रोजगार मिळवण्याकरिता तयार होतात आणि केवळ ४५० नविन रोजगार तयार होतात. त्यातच सध्या नोकरीत असलेल्या नोकरदारांपैकी ५५१ लोकांच्या नोक-या रोज जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २ कोटी रोजगार देऊन असे आश्वासन देशाला दिले होते. परंतु रोजगार निर्मिती करण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. यातच सरकारतर्फे शासकीय कर्मचा-यांची व अधिका-यांची लाखो पदे रिक्त ठेवली जात आहेत हे अतिशय दुर्देवी आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून युवकांनी पकोडे तळावेत अशा त-हेची असंवेदनशील विधाने केली जात आहेत. हा देशातील युवकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. रेल्वेमध्ये जवळपास अडीच लाख पदे रिक्त असताना प्रशिक्षण घेतलेले हे विद्यार्थी ख-या अर्थाने कुशल कर्मचारी आहेत. त्यांना नोकरीपासून वंचित ठेवले जात आहे. स्किल इंडिया सारख्या सरकारच्या घोषणा किती तकलादू आहेत हे यावरून दिसून येत आहे.

ज्या पध्दतीने एवढ्या मोठ्या संख्येने युवक आंदोलनात उतरले त्यातून देशातील युवकांची मानसिकता दिसून येते. या आंदोलनात अनेक युवतीही होत्या त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला.  दमनशाहीने जनतेचा आक्रोश सरकारला दाबता येणार नाही. सरकारने या लाठीमाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

Previous articleअंगणवाडी सेविकांना सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन
Next articleमुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here