अखेर सफाई कामगारपदाची परिक्षा रद्द
मुंबई : “अशा कठीण प्रश्नांची उत्तरे तर मी देखील देऊ शकत नाही” असे सांगत मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार पदासाठी घेण्यात येत असलेली वादग्रस्त लेखी परीक्षा रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालिका आयुक्त अजोय महेता यांना दिले.
गेल्या काही दिवसांपासून सफाई कामगार पदासाठी घेण्यात येत असलेल्या कठीण प्रश्नपत्रिकेवरून परीक्षार्थी तसेच सफाई कामगारांमध्ये प्रचंड असंतोष होता. दहावी पास ही अशी शिक्षणाची अट असलेल्या या परीक्षेत विचारलेले प्रश्न ऐकून अनेक जण चक्रावून गेले होते. मुंबई महापालिकेने १३८८ सफाई कामगारांच्या जागांसाठी पालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली असून या भरतीसाठी सफाई कामगार पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. विधानपरिषद सदस्य भाई गिरकर यांनी यासंदर्भात विधानपरिषदेत आवाज उठवला होता शिवाय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊनही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्नपत्रिकांचे संच दाखवले. हे प्रश्न पाहून मुख्यमंत्रीही चकित झाले . यापैकी काही प्रश्नांची उत्तरे मलाही येत नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे आ. भाई गिरकर यांनी सांगितले . त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सफाई कामगार पदासाठी घेण्यात आलेली परीक्षाच रद्द करण्याचे लेखी निर्देश पालिका आयुक्तांना दिल्याचे गिरकर म्हणाले .