आम्ही पूर्ण ताकदीनिशी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी
अजित पवार
मुंबई : एकीकडे आंदोलन करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावला जातो आणि दुसरीकडे बालविकास मंत्र्यांकडून महिलांसाठी योजना जाहीर केल्या जात आहेत. राज्यातील जनतेने आता सरकारचे हे दुटप्पी राजकारण लक्षात घेतले पाहीजे. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीनिशी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी आहोत असा विश्वास विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांना आज दिला.
अंगणवाडी सेविकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केलेली नाही. आज काही निर्णय महिला व बालविकास मंत्र्यांनी जाहीर केले. पण हे करत असताना त्यांना मेस्मा लावून यात खोच ठेवली आहे. वास्तविक आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे आंदोलनापासून कुणाला अडवता येत नाही.पाच हजाराच्या तुटपुंज्या पगारात आज कुणीही काम करत नाही. शेतामध्ये मजुरी करणार्या भगिनींना देखील ३०० रुपये रोज मिळतो. इथे अंगणवाडी सेविका कुपोषित, गर्भवती महिलांचे आरोग्य नीट राहण्यासाठी प्रयत्न करते. त्यांना फक्त १५० रु. रोज मिळतो. अहो… दिडशे रुपयात दिवसभराचे जेवण तरी येते का असा संतप्त सवाल करतानाच सरकारने त्यांच्यावर मेस्मा लावून नये तसा निर्णय घेणार असाल तर तो तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी पवार यांनी केली.