हिंमत असेल तर ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळात विरोध करून दाखवा!

हिंमत असेल तर मेस्माला मंत्रिमंडळात विरोध करून दाखवा!

 विखे पाटील यांचे सेनेवर टीकास्त्र

मुंबई अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यासंदर्भात सरकारची भूमिका चुकीचीच आहे. हा निर्णय रद्द झालाच पाहिजे. पण शिवसेनेने यासंदर्भात सभागृहात गोंधळ घालून राजदंड उचलणे म्हणजे शुद्ध नौटंकी आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी मेस्माला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध करून दाखवावा, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी डागली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला दडपण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना आमचा तीव्र विरोध आहे. शिवसेनेचीही हीच भूमिका असेल तर ती स्वागतार्हच आहे. परंतु, शिवसेना सरकारमध्ये सहभागी असल्याने त्यांनी या निर्णयाला अगोदर मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र विरोध केला पाहिजे. शिवसेनेने मंत्रिमंडळात आपली भूमिका योग्यपणे पार पाडली तर कदाचित त्यासाठी सभागृहात आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. त्यामुळे शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी ही भूमिका मंत्रिमंडळातही आक्रमकतेने मांडली पाहिजे. शिवसेनेने आज या मुद्यावर केवळ सभागृह बंद करायचे, या हेतूने गोंधळ घातला. त्यासाठी थेट राजदंडही उचलला गेला. सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष असतानाही शिवसेनेला सरकारच्या एखाद्या भूमिकेविरोधात एवढी टोकाची भूमिका घ्यावी लागत असेल तर यातून त्यांची प्रामाणिकता नव्हे तर हतबलताच स्पष्ट होते, असेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

Previous articleआम्ही पूर्ण ताकदीनिशी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी 
Next articleमेस्मा’वर विरोधक आक्रमक;विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here