कॅनडाच्या नागरिकत्वामुळे अक्षय कुमारची राज्यसभेची संधी हुकणार
मुंबई : राष्ट्रपतींच्याद्वारे राज्यसभेवर नियुक्त करण्यात येत असलेल्ये १२ व्यक्ती पैकी येत्या एप्रिल महिन्यात तीन सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, या मध्ये व्यावसायिक अनू आगा, क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर आणि चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा समावेश आहे. या जागेसाठी अक्षय कुमार, जुही चावला आणि गजेंद्र चौहान यांच्या नावाची चर्चा असली तरी पॅडमॅन अक्षय कुमारचे कॅनडाचे नागरिकत्व यामध्ये अडचण ठरू शकते.
अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ येत्या एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे. त्यांच्या जागी राष्ट्रपतींच्या कोट्यातून कोणाला उमेदवारी मिळणार आहे याची चर्चा असतानाच या जागेसाठी चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या जागेसाठी अक्षय कुमार यांच्यासह जुही चावला आणि गजेंद्र चौहान यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर वहिदा रहमान, आशा पारेख, मधुर भांडारकर आणि अनुपम खेर यांच्या नावांची शिफारस पक्षाकडे करण्यात आली असल्याचे समजते. पंतप्रधान स्वच्छता अभियान आणि पॅडमॅन या चित्रपटामुळे अक्षय कुमारचे नाव आघाडीवर असले तरी त्यांच्या कॅनडाच्या नागरिकत्वामुळे अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.