…अन अजित दादा रविंद्र चव्हाणांची फिरकी घेतात, तेव्हा!
मुंबई : वेळ रात्री साडेनऊची…विधानसभेचे कामकाज सुरूच… दोन्हीकडील बाकांवर विधानसभा सदस्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा आज मात्र सभागृहात तळ ठोकून बसले होते , २९३ चा कायदा व सुव्यस्थेचा प्रस्ताव मध्येच थांबवला जातो आणि एका प्रचारात गुंतलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षणाचे शिक्षणाचे एक विधेयक मांडण्याची वेळ आलेले वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण विधेयक मांडण्यासाठी उभे राहतात. विधेयक कोणते तर महाराष्ट्र परिचारिका सुधारणा विधेयक २०१८,मंत्री रविंद्र चव्हाण बिलाची प्राथमिक माहिती देऊन खाली बसतात तोच अजित दादा समोर उभे राहतात आणि सुरू होते प्रश्नांची सरबत्ती …
नर्सेस म्हणजे नेमक्या कोण, राज्यात नर्सेसची संख्या किती आहे , नर्सेसची नोंदणी असली आणि ती कार्यरत नसली तर ती मतदान करू शकते का ? नर्सेस म्हणजे सरकारी रुग्णालयातील नर्सेस की खाजगी रुग्णालयातील ? का प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुद्धा नर्सेस मतदान करू शकतील का ? या विधेयकातील तरतुदीनुसार निवडून येणारे संचालक मंडळ ७ चे असणार, ११ चे असणार, १५ चे असणार ,२१ चे असणार, का २५ चे… आकडा २०० पार गेला तरी दादा यांची गाडी थांबायला काही तयार नाही.
दादांच्या अचानक झालेल्या या हल्लाबोल मुळे मंत्री रविंद्र चव्हाण यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली प्रश्नांची उत्तरे देताना त्यांच्या उडालेली भंबेरीमुळे तालिका अध्यक्षांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला.शेवटी मुख्यमंत्र्यांना चव्हाणांच्या मदतीला यावे लागले आणि होय चे बहुमत होयचे बहुमत म्हणत विधेयक मंजूर झाले.