‘सॅव्ही’ मॅग्झिनच्या मुखपृष्ठावर पंकजाताई मुंडे झळकल्या !
‘पाॅवरफुल पंकजा ‘ शीर्षकाखाली २२ पानांची कव्हर स्टोरी
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा महाराष्ट्रातील धडाडीच्या नेत्या ना. पंकजाताई मुंडे यांना ‘सॅव्ही’ या मुंबईतून प्रकाशित होणा-या सुप्रसिद्ध इंग्रजी मॅग्झिनने मुखपृष्ठावर स्थान दिले आहे. ‘पाॅवरफुल पंकजा’ या शीर्षकाखाली त्यांची सविस्तर अशी बावीस पानांची कव्हर स्टोरी देखील यात प्रकाशित झाली आहे. मासिकात कव्हर पेजवर झळकणा-या ना. पंकजाताई मुंडे हया पहिल्या राजकीय व्यक्ती आहेत, हे विशेष!
सॅव्ही मॅग्झिनचा जागतिक महिला दिना निमित्त एक विशेषांक या महिन्यात प्रसिद्ध झाला आहे. या इंग्रजी मासिकाचा देश विदेशात मोठा वाचक वर्ग आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या धडाकेबाज कामातून राज्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे शिवाय काम करण्याची त्यांची एक स्वतःची खास शैली आहे, अतिशय अभ्यासू व तळमळीने काम करणा-या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांच्या याच धडाडीच्या वृत्तीमुळे मॅग्झिनने त्यांना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. मॅग्झिनच्या संपादिका अॅन्ड्रेया कोस्टबीर यांनी त्यांची विशेष कव्हर स्टोरी अंकात केली असून ही सविस्तर अशी बावीस पानांची मुलाखत आहे. ना. पंकजाताई मुंडे यांचा बालपणापासून ते राजकारणातील प्रवेशापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा यात करण्यात आला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आई प्रज्ञाताई मुंडे, डाॅ. अमित पालवे, खा. पूनमताई महाजन यांचे त्यांच्याविषयीचे मनोगतही यात आहे. याशिवाय त्यांचे विशेष फोटोही मुलाखतीत घेण्यात आले आहेत.
अंकाचे थाटात प्रकाशन
मासिकाच्या या विशेषांकांचे प्रकाशन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते काल गुरूवारी मोठ्या थाटात झाले. यावेळी सॅव्ही मॅग्झिन ग्रुपचे नरी हिरा, संपादिका अॅन्ड्रेया तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.