पुन्हा यायला लावू नका – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा
मुंबई : संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी आज आझाद मैदानावर काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. भिडे गुरुजी यांना आठ दिवसांत अटक करा, असा अल्टिमेटम मुख्यमंत्र्यांना दिला असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. भिंडेना आठ दिवसात अटक करा अन्यथा विधानसभेला घेराव घालावा लागेल, पुन्हा येथे यायला लावू नका, पुन्हा आलो तर जे पाहिजे ते घेतल्याशिवाय पुन्हा जाणार नाही. आज इशारा देऊन थांबत आहे. पण पुढच्या वेळी येईल त्यावेळी माझी दादागिरी चालेल असा इशारा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एल्गार मार्चचा समारोप करताना दिला आहे.
भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने आझाद मैदानात भव्य मोर्चा काढण्यात आला. एल्गार मोर्चा काढणारे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात चर्चेसाठी बोलावले व चर्चा केली.या भेटीनंतर आंबेडकर यांनी माध्यमांना माहिती दिली. भिडे गुरुजींना नरेंद्र मोदींची फूस आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. भिडे यांच्या अटकेसाठी आठ दिवसाची सरकारला मुदत दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर आंबेडकर यांनी एल्गार मोर्चाला संबोधित केले. भिडेंना अटक झाली नाही तर पुन्हा विधानसभेला घेराव घालणार आहे. पुन्हा येथे यायला लावू नका, पुन्हा आलो तर जे पाहिजे ते घेतल्याशिवाय जाणार नाही असा इशारा त्यांनी एल्गार मार्चचा समारोप करताना दिला.