पावसाळी अधिवेशन नागपूरला की मुंबईला ?
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सुप वाजले मात्र आगामी पावसाळी अधिवेशन ४ जुलै २०१८ रोजी होईल, अशी घोषणा विधिमंडळात करण्यात आली असली तरी हे पावसाळी अधिवेशन नागपूरला की, मुंबईला होणार याची घोषणा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
आगामी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही असून, याचा निर्णय घेण्यासाठी संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट,उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार या मंत्र्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.सर्वसाधारण एखादे अधिवेशन समाप्त होताना आगामी अधिवेशनाची तारिख आणि ठिकाणाची घोषणा करण्यात येते मात्र आगामी पावसाळी अधिवेशनाची तारिख घोषित करण्यात आली मात्र हे अधिवेशन नागपूरला की, मुंबईला होणार हे जाहीर करण्यात आले नाही.येत्या ३ एप्रिल रोजी याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक होणार असून,या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशन नागपूरला की मुंबईला घ्यायचे यावर निर्णय घेतला जाणार असला तरी हे अधिवेशन नागपूर मध्येच होण्याची शक्यता आहे.
विधानसभेत एकूण १९ विधेयके मंजूर
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधानसभेच्या कामकाजाचा समारोप आज ‘जन गण मन’ने झाला. विधानमंडळाचे पुढील अधिवेशन ४ जुलै २०१८ रोजी होईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केली.
अधिवेशन कालावधीतील विधानसभेच्या कामकाजाची माहिती देताना अध्यक्षांनी सांगितले की, विधानसभेत एकूण १९ विधेयके मंजूर करण्यात आली असून विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहात १३ विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. या अधिवेशनात विधानसभेच्या एकूण २२ बैठका झाल्या. एकूण १८२ तास कामकाज झाले. दररोज सरासरी ७ तास ४६ मिनिटे कामकाज झाले. अधिवेशनात विधानसभेत ११ हजार ६५७ तारांकित प्रश्न प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ५ स्वीकृत करण्यात आले आणि ७० प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली. २३ अल्पसूचना प्रश्न प्राप्त झाले तर त्यापैकी १ स्वीकृत करण्यात आली.
या अधिवेशनात विधानसभेत ३ हजार ३३० लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ११७ स्वीकृत करण्यात आल्या आणि ४९ लक्षवेधींवर चर्चा झाली. अर्धा तास चर्चेच्या ३९७ सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी १४८ स्वीकृत करण्यात आल्या आणि त्यातील ६ वर चर्चा झाली. नियम २९३ अन्वये ८ प्रस्तावांवर चर्चा झाली. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली. विधानसभेतील सदस्यांची सरासरी उपस्थिती ७९.६ टक्के राहिली. जास्तीत जास्त उपस्थिती ८९.९४ टक्के राहिली तर कमीत कमी ५८.२० टक्के राहिली.यावेळी अध्यक्षांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला आणि त्यानुसार विधान मंडळाचे पुढील अधिवेशन ४ जुलै २०१८ रोजी होईल असेही घोषित केले.