खडसे यांनी शरद पवारांना वाकून नमस्कार केल्याने चर्चेला उधाण
मुंबई : काल जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहणे टाळले असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाकून नमस्कार केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
जळगाव मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि अनेक नेत्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटन होणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगत या कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळले. या अनुपस्थितीची जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाकून नमस्कार केल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी नाराज खडसे यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर उपस्थित राहायचे टाळण्यासाठीच त्यांनी प्रकृतीचे कारण दिले असल्याची चर्चा रंगली होती.
मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याच्या कारणास्तव भाजपवर नाराज असलेल्या खडसेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक वाढवल्याची चर्चा होती. दाेन महिन्यांपूर्वी खडसे यांनी जळगावातील एका कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानात काही ‘गुपित’ सांगून चर्चा केली हाेती.एवढ्यावरच न थांबता खडसे यांनी शरद पवार यांच्या कामाबद्दल स्तुतीही केली होती.