सरकारला छत्रपतींचे नाव फक्त सत्तेसाठी हवं आहे
अजित पवार
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना घेवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हे लोक छत्रपतीचं नाव घेवून काही समाजाला हाताशी धरुन काम करत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भुदरगड येथील जाहीर सभेत दिला.
छत्रपतींच नाव फक्त यांना सत्तेसाठी हवं आहे. मतांसाठी याचं काम सुरु असल्याचा आरोप करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अठरापगड जातींना बरोबर घेवून जाणारा, महिलांना न्याय-सन्मान देणारा आणि शेतकऱ्यांना पुढे नेणारा पक्ष आहे असे स्पष्ट केले.शरद पवारांनी ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आणि आज कर्जमाफी होवूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेनाशी झाली आहे.का लोकांशी खोटं बोलता असा जाब विचारतानाच सभेतील शेतकऱ्यांना देशाचे कृषीमंत्री कोण आहेत.त्यांचं नाव काय असा प्रश्न केला असता कुणालाच नाव सांगता आले नाही त्यावेळी शेतकऱ्यांशी नाळ जोडलेला कृषीमंत्री हवा असा टोला पवार यांनी लगावला.राज्यात मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून ८ लाख कोटीची गुंतवणूक होणार होती. म्हणजे २५ हजार कोटी रुपये प्रत्येक जिल्हयाला चार वर्षात मिळायला हवे होते. आले का? एक रुपया तरी आला का? मग माझ्या तरुणांना रोजगार कसा मिळणार.त्यामुळे लोकांना फसवण्याचे आणि भूलथापा देण्याचे काम थांबवा असा इशाराही त्यांनी दिला.
साखरेला २१०० ते २२०० दर असेल तर साखर परदेशात कशी जाणार त्यासाठी ३७०० दर दयायला हवा होता. उत्पादक आणि ग्राहकाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न शरद पवार कृषीमंत्री असताना करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडलेच नाहीतर लाखाचा पोशिंदा कसा जगणार असा सवाल अजित पवार केला.कॅशलेस,कॅशलेस करुन सर्वांनाच कॅशलेस करुन टाकले आहे. कष्टकरी, शेतमजुर,महिला, एस.टी.कर्मचारी,बेरोजगार,सर्वांनाच न्याय मिळत नाहीय.व्यापाऱ्यांचे तर जीएसटीने कंबरडेच मोडून टाकले आहे.माझ्या शेतकऱ्याने ७५ रुपये जरी बुडवले तरी त्यांची भांडीकुंडी बाहेर काढली जातात आणि संभाजी निलंगेकरांचे ७५ कोटी रुपये बॅंकेचे कर्ज आहे.त्यापैकी २५ कोटी रुपये त्यांनी भरले आणि त्यांचे ५३ कोटी रुपये माफ करण्यात आले हा कुठला न्याय,हा कुठला कायदा,सर्वांना न्याय एकच हवा,वेगळा न्याय खपवून घेणार नाही असा दमही दिला.आज सर्वात जास्त नुकसान हे पश्चिम महाराष्ट्राचे होत असून आपली सर्वच कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे भविष्यात परिवर्तन करायचं असेल तर फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच्या घडयाळयाशिवाय पर्याय नाही. बळीराजाला संपन्न करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या असे आवाहन विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भुदरगडच्या जाहीर सभेत केले.