देवरूख आणि गुहागरमध्ये ६ ऐवजी ११ एप्रिलला मतदान

देवरूख आणि गुहागरमध्ये ६ ऐवजी ११ एप्रिलला मतदान

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख व गुहागर नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमात न्यायालयीन निकालानंतर बदल करण्यात आला असून, आता ६ ऐवजी ११ एप्रिल २०१८ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार देवरूख आणि गुहागर नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व अध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीसाठी ६ एप्रिल २०१८ रोजी मतदान होणार होते; परंतु नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती काही उमेदवारांनी संबंधित जिल्हा न्यायालयात अपील दाखल केली होती. या अपिलांवर २९ मार्च २०१८ पर्यंत निकाल आले. त्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रमात बदल करणे आवश्यक झाल्याने निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी ११ एप्रिल २०१८ रोजी मतदान होईल. मतमोजणी १२ एप्रिल २०१८ रोजी होईल.

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) नगरपंचायत आणि जामनेर (जि. जळगाव) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ६ एप्रिल २०१८ रोजी मतदान होत आहे; परंतु या कार्यक्रमातही न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने अंशत: बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र.१० मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी; तसेच जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.७ मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी ११ एप्रिल २०१८ रोजी मतदान होईल. कणकवली नगरपंचायत आणि जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीची संपूर्ण मतमोजणी १२ एप्रिल २०१८ रोजी होईल.

Previous articleइंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार
Next articleअंबानी आणि अदानींच्या व्यवहारामुळे वीज दर वाढीचे संकट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here