भाजपाच्या महामेळाव्याची जय्यत तयारी 

भाजपाच्या महामेळाव्याची जय्यत तयारी 

५ हजार पदाधिकार्‍यांशी ‘ऑडिओ ब्रीज’द्वारे संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी अर्थात ६ एप्रिल रोजी मुंबईत  लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचा विशाल महामेळावा होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या मेळाव्याला पक्षाच्या बूथस्तरापासून ते प्रदेश पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे आमदार, विभागीय संघटनमंत्री,जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटन महामंत्री, मंडलाध्यक्ष तसेच किसान मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचित जनजाती मोर्चा व युवा मोर्चाचे पदाधिकारी अशा हजारो पदाधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून समूह संवाद साधला आणि त्यावेळी हे आवाहन केले.त्यांनी सांगितले की, पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी महामेळाव्याला आपल्या टीमसोबत यावे. संघटनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा या मेळाव्यास सर्व महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असावेत. मुंबईत होणारा महामेळावा ही जनसभा नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. नवभारताच्या निर्मितीसाठी सज्ज पक्षाचे ते विराटरूपदर्शन असेल. भाजपा हा जगातील सर्वांत मोठा पक्षच नाही तर तो एक मोठा परिवार सुद्धा आहे, याची प्रचिती यावेळी आपले कार्यकर्ते संपूर्ण देशाला देतील आणि हा संदेश महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांकडून असेल.

राज्यभर पक्षाच्या बूथरचनेचे काम यशस्वीरित्या चालू असल्याबद्दल अभिनंदन करून त्यांनी सांगितले की, राज्यभरातील सर्व बूथ प्रमुखांनी या महामेळाव्याला अवश्य यावे. ६ एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत भाजपाची स्थापना झाली. आज भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. देशाच्या २३ राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे. सर्वात जास्त आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच, दलित व आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी अशी भाजपाची भक्कम वाटचाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. भाजपाच्या विविध आघाड्या-मोर्चांनी सुद्धा समाजाशी संवाद साधण्याचे काम अधिक प्रभावीपणे करण्याची गरज आहे. अल्पसंख्यक समाजात भारतीय जनता पार्टीविषयी गैरसमज पसरविण्यात येतात. हे गैरसमज दूर करण्यासाठी पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाने गावोगाव जाऊन संवाद सभा घेतल्या. या संवाद यात्रांबद्दल अल्पसंख्यांक मोर्चा व त्याचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी येथे सभा स्थळाची आणि तेथे होत असलेल्या तयारीची स्वत: जाऊन पाहणी केली आणि तेथे उपस्थित कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधला. मंचव्यवस्था, कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था, कार्यकर्त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग, सुरक्षा आदी सर्व व्यवस्थेबाबतचा तपशील त्यांनी बारकाईने जाणून घेतला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार,मोहित खंबोज आणि इतरही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleराज्य सहकारी संघाचा ‘शिक्षण निधी’ सुरू करण्याची मागणी
Next articleभय्यू महाराज यांच्यासह पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here