नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी उद्या मतदान

नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी उद्या मतदान

सर्व ठिकाणी १२ एप्रिलला मतमोजणी

मुंबई : कणकवली (जि. सिंधुदुर्ग) व आजरा (जि. कोल्हापूर) नगरपंचायत; तसेच जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या दिनांक ६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी मात्र १२ एप्रिल रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले, राज्य निवडणूक आयोगाने ५ मार्च रोजी ६ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार गुहागर, देवरूख (जि. रत्नागिरी),कणकवली (जि. सिंधुदुर्ग), आजरा (जि. कोल्हापूर), जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) या नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी ६ एप्रिल रोजी मतदान व ७ एप्रिल रोजी मतमोजणी होणार होती; परंतु न्यायालयीन निकालाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गुहागर व देवरूख नगरपंचायतींसाठी ११ एप्रिल रोजी मतदान होईल. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र. १० मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी; तसेच जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.७ मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी११ एप्रिल रोजी मतदान होईल. उर्वरीत सर्व ठिकाणी उद्या (ता. ६) मतदान होत आहे.

निवडणूक कार्यक्रमातील बदलानुसार ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानावर प्रभाव पडू नये म्हणून या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांची संपूर्ण मतमोजणी १२ एप्रिल रोजी होईल. रत्नागिरी, आळंदी, तासगाव, दुधनी, सावदा, कुंडलवाडी व कळंब या नगरपरिषदा,नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदासाठीदेखील उद्या (ता. ६) मतदान होत आहे. यांची मतमोजणीही १२ एप्रिल २०१८ रोजी होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.नगरपरिषद, नगरपंचायतनिहाय एकूण जागा आणि सदस्य व अध्यक्षपदाच्या उमेदवारांची संख्या: गुहागर (१७)- ४७, अध्यक्ष- ३, देवरूख (१७)- ६२, अध्यक्ष- ५, कणकवली (१७)- ५९, अध्यक्ष- ४, आजरा (१७)- ७०, अध्यक्ष- ३, जामनेर (२४)- ५७, अध्यक्ष- २ आणि वैजापूर (२३)- ५४, अध्यक्ष- ५.

महानगरपालिकांमधील ६ रिक्तपदासांठी उद्या मतदान

मुंबईच्या एका जागेचा समावेश

बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सहा महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता. ६) मतदान होत असून ७ एप्रिल रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

सहारिया यांनी सांगितले, बृहन्मुंबई, नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता.६) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.महानगरपालिकानिहाय पोटनिवडणूक होत असलेल्या प्रभागाचे नाव व उमेदवारांची संख्या: बृहन्मुंबई (१७३)- ३, नाशिक (१३-क)- ८ सोलापूर (१४-क)- ९, पुणे- (२२-क) ५, अहमदनगर- (३२-ब)- ३ आणि उल्हासनगर (१७-ब)- ४

Previous articleधनंजय राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ – अजित पवार
Next articleराष्ट्रवादीला धक्का ; मांडव्याच्या सरपंच भाजपात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here