भाजपच्या महामेळाव्यामुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबई: स्थापना दिवसा निमित्त बीकेसीच्या मैदानावर होत असलेल्या भाजपच्या महामेळाव्यामुळे आज सकाळपासूनच चेंबूर, बांद्रा, दादर आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने संतप्त नागरिकांनी बांद्रा येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या बस थांबवून धरल्या होत्या त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
भाजपच्या या महामेळाव्यामुळे मुंबईकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. बस, जीपमधून कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी घाई करीत असल्याने या बसेस पोलीसांना कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी बाचाबाचीचा प्रकार घडले आहेत. भाजपाच्या या महामेळाव्यामुळे झालेल्या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महामेळाव्यासाठी भाजपाचे लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे बांद्रा आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पश्चिम द्रूतगती मार्गावर तर कालपासूनच वाहतूक कोंडी होण्यास सुरूवात झाली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे काल आगमन झाले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती त्यामुळे सुमारे पाच तास वाहतूक खोळंबली होती.