गोपीनाथ मुंडेंचा फोटो न लावल्यामुळे समर्थकांची घोषणाबाजी
मुंबई : भाजपच्या स्थापनादिवसाच्या निमित्ताने बीकेसीच्या मैदानावर सुरू असलेल्या महामेळाव्याच्या ठिकाणी भाजपच्या अनेक नेत्यांचे पोस्टर लावण्यात आली आहेत मात्र ज्यांनी महाराष्ट्रात भाजप वाढवली त्या भाजपाचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो न लावल्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाले असून त्यांनी घोषणाबाजी केली.
बीकेसीतील मैदानावर भाजपाचा महामेळावा सुरु होण्यापूर्वी हा प्रकार घडला आहे. महामेळाव्याच्या मुख्य मंडपामध्ये दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्यामुळे मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी करीत आपली नाराजी व्यक्त केली. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नाराज कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली.भाजपा आज आपला ३८ वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. या निमित्ताने भाजपाने शक्तिप्रदर्शनाचा घाट घातला आहे.