भाजपच्या जाहिरातीत एकनाथ खडसेंना पाचवे स्थान
मुंबई : बीकेसीच्या मैदानात भाजपचा महामेळावा सुरू असून,या मेळाव्याच्या वातावरण निर्मितीसाठी भाजपने विविध वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात केली आहे.मात्र महाराष्ट्रात भाजपच्या वाढीसाढी आपले उभे आयुष्य खर्ची घालणा-या एकनाथ खडसे यांना या जाहिरातीत पाचवे स्थान देण्यात आले आहे.
भाजपने स्थापना दिनाचे औचित्यसाधून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले आहे.गावापासून ते शहरापर्यंत मोठमोठी बॅनर्स लावण्याबरोबरच स्थानिक वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिध्द केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिक नेत्यांना जाहिरातीत स्थान देण्यात आले आहे मात्र प्रदेश भाजपाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये एकनाथ खडसे यांना चक्क पाचवे स्थान देण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रथम, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दुसरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तिसरे तर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना या जाहिरातीत चौथे स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रात भाजपला उभारी देण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मोलाचा वाटा असतानाही भाजपकडून होत असलेल्या या वागणूकीमुळे खडसे समर्थकांमध्ये नाराजीची भावना आहे.