खबरदार.. पवार साहेबांवर केलेली टिका खपवून घेणार नाही
धनंजय मुंडे यांचा इशारा
सोलापूर : जो पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे त्यांच्या नेत्याकडून मोठ्या अपेक्षा असतात. स्थापना दिवशीच्या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भाषणात मात्र केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दहशत दिसत होती. दिल्लीतून रिंगमास्टर आल्याने त्यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना केवळ जनावरे दिसत होती अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. खबरदार पवार साहेबांवर एका शब्दानेही केलेली टीका सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी सोलापूरच्या हल्लाबोल यात्रेतल्या विराट सभेत बोलतांना दिला.
मुंबईत आज झालेल्या भाजपाच्या महामेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर झालेल्या टिकेला मुंडे यांनी अतिशय जोरदार उत्तर दिले. यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, आज भाजपचे नेते गेल्या चार वर्षात काय केलं ते भाषणात सांगातील, मुख्यमंत्री सांगतील की त्यांनी काय विकास केला मात्र त्यांच्या संपूर्ण भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच उल्लेख होता. आज मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असल्यासारखे बोलत होते. यांना माहिती आहे राज्यात भाजपची सत्ता जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता येईल. सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्याप्रमाणे बोलल्यापेक्षा आता पासूनच सवय म्हणून ते बोलेल असावेत असा टोला त्यांनी लगावला.
पवार साहेब यांच्यावर मेळाव्यात केलेल्या टिकेला उत्तर देतांना मुंडे म्हणाले की, फडणवीस साहेब तुम्ही भले राज्याचे मुख्यमंत्री असाल मात्र पवार साहेबांविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही. काही करायचे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी नाद करायचा नाही असा इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्री महोदय जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, तुमचे गुरू आमच्या गुरूचे बोट पकडून राजकारणात आले आहेत हे बहुदा तुम्ही विसरलात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय पवार साहेबांचे वय काय ? पवार साहेबांचे कर्तृत्व काय तुमचे कर्तृत्व काय ? हे आठवून पहा असा सल्लाही त्यांनी दिला.
फडणवीस सरकारच्या भ्रष्ट्राचारावर बोलताना मुंडे म्हणाले की , तुमच्या १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले त्यांची साधी चौकशी तुम्हाला करता येत नाही, मी मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो की मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांची चौकशी करावी तरच म्हणता येईल की तुमचे सरकार पारदर्शक आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
आज विरोधी पक्षाला लांडगे म्हणतात २०१४ च्या वेळी तुम्ही एकत्र आले होते त्याला कशाचा कळप म्हणायचा ? असा सवाल करून भाजप सेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता येणार असा विश्वास व्यक्त केला.
सोलापूर महानगरपालिकेतील कारभारावरही त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ही महानगरपालिका एक नवा विक्रम करणार आहे. या महानगरपालिकेत एकही जनरल बॉडी मीटिंग घेतली गेली नाही. कुणामुळे झाले तर भाजपच्या दोन नेत्यामुळे, कुणाचा वाटा किती त्यासाठी हे सगळे झाले असल्याचे सांगतांना सुभाष देशमुख सर्वात जास्त भ्रष्ट मंत्री आहेत असा आरोप केला.
या सरकारच्या भ्रष्टाचाराविषयी बोललाय लागलो तर सभा सकाळी ६ ला संपेल असे सांगतानाच तिकडे मंत्रालयात उंदिरांचा भ्रष्टाचार होतो आणि इकडे दोन उंदिर हैदोस घालत आहेत . मुख्यमंत्र्यांनी सोलापूरचा अपमान केला ते म्हणाले की सोलापूर महानगरपालिका बरखास्त करू आधी तुमच्या भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी ही त्यांनी केली.