नाशिक विमानतळास दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या
नाशिक : नाशिक (ओझर) विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली.
गोडसे यांनी आज प्रधानमंत्री मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन सदर निवेदन सादर केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान आणि नाशिकवर सदैव त्यांचे राहिलेले विशेष प्रेम याचा विचार करून नाशिकच्या विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देवून त्यांच्या गौरवशाली कार्याचा सन्मान करावा, असे हेमंत गोडसे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
‘नाशिक विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आम्ही नक्की देऊ’, असे आश्वासन प्रधानमंत्री व केंद्रीय गृहमंत्री यांनी दिले. खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारच्या उड़ाण योजनेंतर्गत नाशिक शहरात देशातील सर्वाधिक विमानसेवा सुरु होत आहेत. नाशिक विमानतळ देशातल्या ९ महानगरांना हवाई वाहतुकीने जोडले जाणार आहे.
मुंबई, पुणे सेवा सुरु झाली असून जून २०१८ पर्यंत दिल्ली, हैदराबाद, बैंगलोर, अहमदाबाद, गोवा, भोपाळ, हिंडन (गझियाबाद) विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे नाशिक जिल्हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नकाशावर उमटेल. तसेच, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला दिल्यास औचित्यपूर्ण ठरेल, असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला