भाजप-सेनेच्या लोकांच्या डोक्यात कुठं पाणी भरतंय तेच कळेना
अजित पवार
टेंभुर्णी : सगळी सोंगं करता येतात परंतु पाण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही परंतु भाजप-सेनेच्या लोकांचं डोकं कुठे पाणी भरतंय तेच कळत नाहीय अशा शब्दात अजित पवारांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला.
धरणात पाणी भरलेलं असतानाही शेतकऱ्यांना पाणी देत नाहीय. वीज कनेक्शन तोडण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर विकासाला पैसाही सरकार द्दयायला नाही.हे सरकार शेतकरी विरोधी आहे असा आरोपही दादांनी केला.माझ्या पोटाला चिमटा बसू लागलाय हे लोकांना कळू लागल्यानेच जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनामध्ये उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरत सरकारचा विरोध करताना दिसत आहे असेही दादा म्हणाले.
शेतकरी कर्जमाफी नाही, जातीचे आरक्षण दिलंच नाही,काळा पैसा आणतो म्हटले अदयाप पत्ता नाही,२ कोटी तरुणांना नोकऱ्या देतो सांगितलं दिल्या नाहीत,भ्रष्टाचारमुक्त देश करतो सांगितले परंतु यापैकी काहीच सरकारने पूर्ण केले नाही अशा फसव्या आणि नाकर्त्या सरकारच्याविरोधात राष्ट्रवादीने हे हल्लाबोल आंदोलन पुकारले असल्याचे दादांनी सांगितले.
पुढील २५ वर्ष तरी कमळाबाईची पाकळीही सापडता कामा नये
धनंजय मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसादच भाजपाला झोपू देत नाहीय.आत्ता भाजपाच्या कमळाबाईला असे हद्दपार करुया की,२५ वर्ष तरी या कमळाबाईची पाकळीही सापडता कामा नये असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत केले.टेंभुर्णीच्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांवर आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आपल्या शैलीत चांगलाच समाचार घेतला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा आजचा सहावा दिवस असून पहिली सभा सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये प्रचंड उत्साहात आणि रणरणत्या उन्हात पार पडली.